बीड जिल्हा रुग्णालयास दिवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:43 AM2018-11-11T00:43:16+5:302018-11-11T00:44:00+5:30
परळी येथे एका कार्यक्रमात शब्द दिल्याप्रमाणे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बीड येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटरसाठी ६ लाख ५० हजारांचा निधी उपलब्ध केला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : परळी येथे एका कार्यक्रमात शब्द दिल्याप्रमाणे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बीड येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटरसाठी ६ लाख ५० हजारांचा निधी उपलब्ध केला आहे. यामुळे आयसीयू विभागा सुसज्ज होण्यास मोठा हातभार लागणार असून रुग्णांना उपचारासाठी सुविधा मिळणार आहे.
जिल्हा रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी रुग्णालयातील आवश्यक सुविधांसह रुग्णांवर परिपूर्ण उपचारासाठी प्रयत्न सुरु केले. शासन पातळीवर उपलब्ध होणारी मदत कामी आली. तरीही इतर सुविधांसाठी लोकसहभागातून मदत उभी करता येईल या हेतूने जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्ष अद्ययावत करण्यासाठी डॉ. थोरात यांनी सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. चर्चेनंतर स्व. झुंबरालाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नवरात्रमध्ये आयसीयू विभागात १२ बेड उपलब्ध करुन देण्यात आले.
दरम्यान, परळी येथे वैद्यनाथ देवस्थानच्या डायलेसिस सेंटरमध्ये जर्मन तंत्रज्ञानाची मेडिकल केअर मशीन राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी उपलब्ध करुन दिली होती. लोकार्पण कार्यक्रमात डॉ. थोरात यांनी डिगे यांच्याशी जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागासाठी मदतीबाबत चर्चा केली. त्यावेळी डिगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत १२ मल्टीपॅरा मॉनिटर मदतीची ग्वाही दिली होती. यानंतर डॉ. कमलाकर आंधळे यांनी एक मल्टीपॅरा मॉनिटरची भेट जिल्हा रुग्णालयासाठी दिली.
सणाचे औचित्य साधत शिवकुमार डिगे यांनी उर्वरित लागणाऱ्या ११ मल्टीपॅरा मॉनिटरसाठी ६ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन एका प्रकारे दिवाळीची भेटच बीडकरांना दिली आहे. अंबाजोगाई येथे या निधीचा धनादेश नुकताच त्यांनी डॉ. थोरात यांच्याकडे सुपूर्द केला.