बीड जिल्हा रूग्णालयाची सेवा आजारी; एक-दोन नव्हे तर तब्बल तब्बल १० डॉक्टर ओपीडीत गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 08:38 PM2024-02-13T20:38:36+5:302024-02-13T21:07:01+5:30
जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा आजारी पडली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी (मोजके) हे कर्तव्यात हलगर्जी करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजून ५ मिनीटांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी अचानक ओपीडी विभागाचा राऊंड घेतला. यावेळी एक-दोन नव्हे तर तब्बल १० डॉक्टर गैरहजर आढळले.
या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या प्रकारामुळे जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा आजारी पडली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रामाणिक डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत असून त्यांच्याकडेही बघण्याचा दृष्टीकोण बदलू लागला आहे. गैरहजर डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामान्यांमधून हाेत आहे.
गैरहजर असलेले १० डॉक्टर
त्वचारोग तज्ज्ञ डॉ.दीपक राऊत, डॉ.खोसे, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ.मीनाक्षी साळुंके, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.सचिन देशमुख, सर्जन डॉ.येवले, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.नितीन राठोड, बालरोग तज्ज्ञ डॉ.रविकांत चौधरी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मोहमंद मुजाहेद, मानिसक आजार केंद्रातील तांदळे, दंत शल्य चिकित्सक डॉ.बनसोडे, फिजिशियन डॉ.अनंत मुळे यांचा हे सर्व जण सीएसने केलेल्या राऊंडमध्ये गैरहजर आढळले.
मंगळवारी दुपारी ४ वाजून ५ मिनीटांनी राऊंड घेतला. यात १० डॉक्टर आणि एक कर्मचारी गैरहजर आढळले. या सर्वांना नोटीस बजावली आहे. सेवेत हलगर्जी करणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही.
- डॉ.अशोक बडे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड