गुन्हेगारांचा नव्हे, तर गुणवंतांची खाण असणारा बीड जिल्हा; युपीएससीत दोघांनी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:01 IST2025-04-23T12:01:18+5:302025-04-23T12:01:48+5:30
बीडला बिहार असे संबोधले, तर कोणी बीडला गुन्हेगारांचा जिल्हा म्हटले. परंतु, याच जिल्ह्यातील तरुणांनी लोकसेवा आयोगासारख्या सर्वोच्च परीक्षांचा डोंगर सर केला आहे.

गुन्हेगारांचा नव्हे, तर गुणवंतांची खाण असणारा बीड जिल्हा; युपीएससीत दोघांनी मारली बाजी
- सोमनाथ खताळ
बीड : स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरण, माजलगावातील दिवसाढवळ्या खून, छेडछाड, अत्याचार, हाणामाऱ्या, आदी घटना मागील काही दिवसांत जिल्ह्यात वाढल्याचा दावा राजकीय नेत्यांसह इतरांनी केल्याने बीडचे नाव देशभरात चर्चेत आले. बीडला बिहार असे संबोधले, तर कोणी बीडला गुन्हेगारांचा जिल्हा म्हटले. परंतु, याच जिल्ह्यातील तरुणांनी लोकसेवा आयोगासारख्या सर्वोच्च परीक्षांचा डोंगर सर केला आहे. दोघांनी यश मिळविल्याने बीड जिल्हा हा गुन्हेगारांचा नव्हे, तर गुणवंतांची खाण असलेला जिल्हा म्हणून ओळख होत आहे. यापूर्वीही अनेकांनी युपीएससीत यश मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
१ - डॉ. अक्षय संभाजी मुंडे, परळी
रँक - ६९९
परळी तालुक्यातील पांगरी गावातील सामान्य कुटुंबात जन्म झाला. लहानपणीच पितृछत्र हरवले. आई इंदुबाई मुंडे या शेतात काम करतात. निरक्षर असतानाही आईने मुलाला शिकवले. त्याचे चीज आता अक्षय यांनी करून दाखवले आहे. लातूरला बीडीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभ्यासासाठी पुणे गाठले, तेथून पुन्हा दिल्लीला उड्डाण घेतले. आईसोबतच बहीण अक्षता यांचीही खूप मदत झाली. जिद्दीने यश मिळविल्याचे अक्षय सांगतात.
बीड जिल्ह्याच्या भूमीपुत्रांचे मनस्वी अभिनंदन !!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 22, 2025
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र परळी तालुक्यातील पांगरी ( गोपीनाथगड ) येथील चि. अक्षय संभाजी मुंडे व पाटोदा तालुक्यातील डॉ. पंकज आवटे यांनी दैदिप्यमान यश संपादित करत UPSC परीक्षेत घवघवीत यश… pic.twitter.com/qWXflwmKcu
२ - डॉ. पंकज नारायण आवटे, पाटोदा
रँक - ६५३
पाटोदा तालुक्यातील नायगाव हे डाॅ. पंकज यांचे गाव. वडील नारायण हे निवृत्त फौजी, तर आई पंचफुला या गृहिणी. भाऊ शैलेंद्र हा सहायक पोलिस निरीक्षक असून, बहीण वर्षा या आयटी क्षेत्रात नोकरी करत असून, त्यांचाही यशात वाटा आहे. २०१८-१९ साली गडचिरोली जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून वर्षभर सेवा दिली. नंतर दिल्लीला जाऊन अभ्यास केला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आज पंकज यांनी यश संपादन केले आहे.