बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास

By सोमनाथ खताळ | Published: July 13, 2023 08:57 PM2023-07-13T20:57:34+5:302023-07-13T20:57:41+5:30

जिल्हाभरात क्रेनने हार घालून, तर जेसीबीने फुले उधळून स्वागत

Beed district is and will remain of NCP's, Dhananjay Munde believes | बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास

बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास

googlenewsNext

सोमनाथ खताळ
बीड :
अनेक वर्षांपासून जिल्हा मागासलेला आहे. तो विकसित करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसून टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे म्हणत बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील, असा विश्वास कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. युतीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते गुरुवारी पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. यावेळी मोठ्या क्रेनने हार घालून व जेसीबीने फुले उधळत, ढोल-ताशा आणि फटाक्यांची आतषबाजी करत मुंडे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. या अगोदर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी असताना मुंडे यांनी सामाजिक न्याय विभाग सांभाळला. तसेच अडीच वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिले. परंतु, नंतर उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली. त्यामुळे सरकार बदलले. धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना वर्षभर विरोधी बाकावर बसावे लागले. परंतु, आता पुन्हा शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीही फुटली. एक मोठा गट घेऊन अजित पवार यांनी भाजप, शिवसेना यांच्यासोबत युती केली. यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे गुरुवारी पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आले. अगदी जिल्ह्याची सीमा असलेल्या कडा येथून सुरू झालेले स्वागत परळी शहरात आल्यावर थांबले. चौक, गावे, शहरे, फाटा, आदी ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

मंत्री युतीचे अन् स्वागतासाठी केवळ राष्ट्रवादीच

राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार आले. याच सरकारमधील मंत्री तथा परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे गुरुवारी बीड जिल्ह्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी अहमदनगरच्या सीमेपासून ते परळी मतदारसंघापर्यंत तयारी केली होती. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. परंतु, या स्वागतासाठी राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. युतीचे मंत्री असतानाही भाजप आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कोठेही उपस्थिती दिसून आली नाही.

क्रेनने घातले क्विंटलचे हार अन् जेसीबीने उधळली फुले

धनंजय मुंडे यांचे ठिकठिकाणी क्रेनने एक क्विंटलपेक्षा जास्त वजनाचे हार घालून स्वागत करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी जेसीबीमधून फुलांची उधळण केली. १५ ते २० मिनिटे वाजणाऱ्या फटाक्यांसह ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यापूर्वीही आमदार झालो, मंत्री झालो, परंतु एवढे अभूतपूर्व स्वागत पहिल्यांदाच होत असल्याची प्रतिक्रियाही मुंडे यांनी पाटोद्यात दिली.

पवारसाहेब आमचे दैवत..

शरद पवार हे आमचे दैवत असून काल, आज आणि उद्याही ते राहतील. देवाचा फोटो घरातही लावतात. भक्तांनी देवाची पूजा करायची असते. देवाला भक्ताची ओळख नसते, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी बॅनरवरील फोटोबाबत प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी फोटो वापरू नका असे म्हणाले होते, असे विचारताच मुंडे यांनी मला माझ्या देवाची पूजा करायचा पूर्ण अधिकार असून, मी ती करणारच, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Beed district is and will remain of NCP's, Dhananjay Munde believes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.