बीड जिल्ह्यात १ लाख ९२ हजारांवर सभासद राहणार विमा योजनेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:09 AM2019-06-08T00:09:23+5:302019-06-08T00:09:57+5:30
प्रभात बुडूख । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खरीप हंगामातील सोयाबीन सोडून इतर पिकांचा विमा मंजूर झाला असून, त्याची ...
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खरीप हंगामातील सोयाबीन सोडून इतर पिकांचा विमा मंजूर झाला असून, त्याची रक्कम संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. मात्र, १४ लाख सभासदांपैकी १ लाख ९२ हजार जणांना विमा मिळणार नसल्याची गंभीर बाबसमोर आली आहे. अद्यापपर्यंत जिल्हाभरातील बहुतांश शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य विमा कंपनीला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.
विमा कंपनीकडून सोयाबीन सोडून इतर खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कापूस, सोयबीन, खरीप ज्वारी, मूग, उडीद, तीळ यासह इतर पिकांसाठी शेतकºयांनी ५३ कोटी व शासनाने भरलेली रक्कम मिळून ५४० कोटी ५३ लाख ३५ हजार रुपये भरणा ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे करण्यात आला आहे. यासाठी विमा संरक्षित रक्कम २१०० कोटी ५८ लाख एवढी ठेवण्यात आली आहे.
प्रत्यक्षात आतापार्यंत सोयाबीन सोडून इतर पिकांच्या विम्यापोटी ३४६ कोटी ३९ लाख ६३ हजार एवढी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. यामध्ये देखील अनेक मंडळातील शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
यासंदर्भात अंबाजोगाई, धारुर, गेवराई, बीड व इतर तालुक्यातील वंचित शेतकरी विमा कधी मिळणार याची विचारणा करण्यासाठी बीड येथील विमा कंपनीच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. त्या ठिकाणी त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. खरीप हंगाम जवळ येत असून खत, बी-बियाणांच्या खरेदीसाठी पैसे नसल्याचे देखील शेतकºयांनी त्या अधिकाºयाला सांगितले. मात्र, मी काहीही करु शकत नाही. कंपनीकडे ही समस्या पोहचवली असून, त्यांच्याकडून विमा रक्कम मिळाली की तुम्हाला मिळेल याला दोन महिने लागतील असे उत्तर दिले. त्यामुळे कार्यालयाबाहेर येऊन विमा कंपनीला शासनाचा व प्रशासनाचा धाक नाही, तसेच दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.
२१५८ कोटी विमा रक्कम संरक्षित, वाटप मात्र, ३४६.३९६३ कोटी
विविध पिकांसाठी १४ लाख ११ हजार ६१३ सभादांनी योजनेत सहभाग घेत विमा रक्कम भरली होती.
यामध्ये सोयबीन पिकासाठी ४ लाख ७६ हजार ५६८ सभासद आहेत. यांना विमा मिळणे बाकी आहे.
मात्र, इतर पिकांसाठी लाभ दिलेल्या सभासदांची संख्या ७ लाख ४२ हजार ९१५ एवढी आहे.
सोयबीनच्या सर्व सभासदांना लाभ दिला असे गृहीत धरले तरी देखील १ लाख ९२ हजार १३० सभासद या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
केंद्र व शेतक-यांनी भरलेल्या रकमेवर २१५८.०५७९ कोटी एवढी रक्कम विमा वाटपासाठी संरक्षित केली आहे. वाटप मात्र, ३४६.३९६३ एवढीच केले आहे.