बीड जिल्ह्यात ६८.१२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:11 AM2019-10-22T00:11:33+5:302019-10-22T00:13:11+5:30
जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला.
बीड : जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला. तर जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शांत, संयमी भूमिकेमुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.
जिल्ह्यात २३२१ मतदान केंद्रे होती. १२ सखी मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन सांभाळले. तर ६ मॉडेल मतदान केंद्रांमुळे त्या केंद्र परिसरात उत्साह दिसला. मतदान केंद्र शोधत येणाºया बहुतांश मतदारांनी त्यांना बीएलओंकडून व्होटर स्लीप मिळाल्याच्या नसल्याच्या तक्रारी केल्या.
सायंकाळी ६ वाजता मतदान वेळ संपली. या वेळेपर्यंत केंद्रात आलेल्या मतदारांना मतदान करता आले. त्यानंतर निवडणूक कर्मचारी यंत्र व साहित्यासह अधिग्रहित केलेल्या वाहनातून मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचत होते. रात्री दहा वाजेपर्यंत गेवराई मतदार संघातील ३९५ पैकी २०१ केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी पोहोचले होते, माजलगाव मतदार संघातील सर्व ३७४ मतदान पथक पोहोचले होते. बीडमध्ये ३७४ पैकी २२६ पथक पोहोचले होते. आष्टीतील ४३८ पैकी २४७ पथक पोहोचले होते. केजचे ४०५ पैकी २५० आणि परळीचे ३३५ पैकी १६९ पथक मुख्यालयात पोहोचले होते.
पूर आल्याने कर्मचारी अडकले
बीड तालुक्यातील राजुरीजवळ नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे मतदान यंत्रे घेऊन येणाºया दोन बसेस व त्यामधील ५० ते ६० कर्मचारी साडेनऊच्या सुमारास अडकले होते.
प्रशासनाची तत्परता
बहुतांश मतदान केंद्रांवर व्हीलचेअर नसल्याने दिव्यांग मतदारांना खुर्चीद्वारे, तसेच खांद्यावरुन न्यावे लागले. तर मतदान केंद्राच्या ठिकाणी दूतांनी दिव्यांगांसह वृध्द मतदारांना आधार देत कर्तव्य बजावले. पुरेशा पोलीस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
चिखल, पावसातही लोकशाहीचा उत्सव
बीड : रविवार आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे विधानसभा निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतदानावर परिणाम झाला असलातरी उघडीप झाल्यानंतर मतदानाचा ओघ कमालीचा वाढला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण ६० च्या पुढे गेले.
पहाटे मॉकपोल झाल्यानंतर ठीक सात वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली. मात्र पावसामुळे केंद्र परिसरात काही ठिकाणी पाणी साचले होते. तर काही ठिकाणी मतदारांना चिखल तुडवत जावे लागले. पावसाची तमा न बाळगता मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केले. काही मतदारांनी छत्रीचा वापर करत केंद्र गाठले.
अंबाजोगाईसह तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत तुरळक गर्दी होती. ११ वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. परळीत पावसामुळे ९ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. गेवराई शहरातील जिल्हा परिषद शाळा केंद्राभोवती चिखल साचल्याने मतदारांना कसरत करत मतदानासाठी जावे लागले. माजलगाव मतदार संघात वडवणी, धारुर तालुक्यांचा समावेश आहे. सकाळी सर्वत्र पाऊस असल्याने दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. सखी मतदान केंद्र परिसरात अनेक ठिकाणी चिखल झाल्याने या केंद्रावर कमानीची सजावट करता आली नाही. तर काही केंद्रावर चिखल झाल्याने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा गोरे यांनी स्वत: उभा राहून रस्ता तयार करु न घेतला. आष्टी तालुक्यातही पाऊस व चिखलाचा परिणाम झाला. बीडमध्येही पहाटे तुरळक पाऊस आणि गारठ्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर वर्दळ थंडावली होती. बारा वाजेनंतर मतदानासाठी मतदार घराबाहेर पडत होते.