मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 05:30 PM2021-08-31T17:30:50+5:302021-08-31T17:57:09+5:30
दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील छोटी धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिकांनाही जीवदान मिळाले आहे.
बीड : मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची बीड जिल्ह्यात नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७५ मिमी पाऊस झाला असून अनेक नद्यांना पूर आला आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील छोटी धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिकांनाही जीवदान मिळाले आहे. बीड जिल्हा तालुका निहाय पाऊस(mm) : पाटोदा-67, आष्टी-105, धारूर-29.7, केज-37, माजलगाव-56, अंबेजोगाई-105, शिरूर कासार-70, परळी-27 वडवणी-72
माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पुर आला आहे. तर आंबेसावळी नदी देखील खळखळून वाहत आहे. बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला असून दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता आहे.
धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावाने तालुक्यातील घागरवडा, आरणवाडी, कुंडलीका आणि धारूर साठवण तलाव काठोकाठ भरली आहेत. तसेच तालुक्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाचा पिकांना फायदाच होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
नागापूर धरण भरल्याने परळीकरांना दिलासा
परळी शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासून पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन सहित सर्व पिकांना जीवनदान मिळाले आहे. वाण धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. वाण नदीला पूर आला आहे. पावसामुळे नुकसान काही झाले नसून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील नागापूर धरण भरल्याने परळीकरांची पाणी समस्या दूर झाली आहे.
माजलगाव धरणाचा पाणीसाठी ५० टक्क्यांवर
माजलगाव धरण परिसरात मागील 24 तासात 50 मी.मी.पावसाची नोंद झाली. मंगळवारी पहाटे धरण परिसरात जोरदार पाऊस झाला.यामुळे धरणात चांगल्याच पाण्याची वाढ झाली. चोवीस तासापूर्वी धरणात 35 टक्के पाणी साठा होतो तो मंगळवारी दुपारी 50 टक्के झाला होता.यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
आष्टीतील मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
सकाळपासून पाऊस सुरू असल्याने जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून रस्ते ही वाहून गेली आहेत.नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उडीद,बाजरी,मुग,सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असून भिजून मोठे नुकसान झाल्याने या पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गेवराईत गोदावरी-सिंधफनाच्या पाणी पातळीत वाढ
गेवराई तालुक्यात सोमवारी दिवसभर रिमझिम पावसानंतर मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. यातच हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचे सातत्य आणि मोठा विसर्ग यामुळे गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी वाढली आहे. तसेच सिंधफना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले
वडवणी तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. यामुळे 100% पाणी साठा आरक्षित ठेवून प्रकल्पाचे पाच दरवाजे मंगळवारी पहाटेच्या सुमारास 90 सेमीने उघडण्यात आले. प्रकल्पातून नदीपाञात 12857 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या निम्न भागातील कुंडलिका नदीकाठी असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश सिरसेवाड यांनी दिली आहे.