आधी पंकजा मुंडेंच्या विरोधातील ऑडिओ क्लिप व्हायरल, आज शिंदेंच्या जिल्हा प्रमुखांना मारहाणीच्या गुन्ह्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 09:27 AM2024-06-29T09:27:25+5:302024-06-29T09:29:19+5:30
काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत विधाने होती. यानंतर बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. दरम्यान, आता कुंडलिक खांडे यांच्याबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कुंडलिक खांडे यांना एका मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
आता नो क्लोजर, फक्त बुलडोझर; राज्यातील अवैध पब, बारवर कारवाईचे CM एकनाथ शिंदेंचे आदेश
बीड-अहमदनगर मार्गावरील जामखेड येथून कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा ताबा आता बीड ग्रामीण पोलिसांकडे देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी कुंडलिक खांडे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दोन दिवसापूर्वी ऑडिओ क्लिप झाली व्हायरल
कुंडलिक खांडे यांची दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये खांडे यांनी लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना मदत केली होती, तसेच धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याबाबत वक्तव्य केले होते. या क्लिपमुळे बीड जिल्ह्यातील वातावरण तापले होते.
कुंडलिक खांडे, शिवराज बांगर विरोधात परळीत गुन्हा दाखल
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विषयी आक्षेपार्ह शब्द वापरलेली ऑडिओ क्लिप जाणीवपूर्वक संगनमताने व्हायरल करून दोन जातीत तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)चे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या विरोधात परळीच्या शहर पोलीस ठाण्यात 28 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक कराड यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांची विषयी आक्षेपार्ह शब्द काढून गाडी फोडण्याची भाषा वापरून दोघांच्या सवांदाची ऑडिओ क्लिप व्हायरल करून दोन जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी कुंडलिक खांडे व शिवराज बांगर या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे हे करीत आहेत.