बीड जिल्हा शल्य चिकित्सकाचा वादग्रस्त आदेश; म्हणे, कर्तव्यावर असताना जीन्स घालायची नाही
By सोमनाथ खताळ | Published: October 7, 2022 12:19 PM2022-10-07T12:19:47+5:302022-10-07T12:20:07+5:30
बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ३० ऑक्टोबर रोजी एक आदेश काढला. यात त्यांनी कर्तव्यावर असताना टी-शर्ट, जीन्सचा वापर करू नये असे म्हटले आहे.
बीड :बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी एक आदेश काढून वाद निर्माण केला आहे. कार्यालयातील पोशाखाबाबत त्यांनी टी-शर्ट सोबत जीन्स वापरावरही बंदी घातली आहे. ८ डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यालयात केवळ टीशर्ट वापर करू नये, असे स्पष्ट म्हटलेले आहे. परंतू जीन्स वापरण्यावर बंदी घातल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत मॅग्मोने निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे.
आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी स्विकारला. शिस्तप्रीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते रूजू होताच त्यांनी डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या सुचना केल्या. तसेच एका बैठकीत कार्यालयीन पोशाखाचाच वापर करावा, असे सांगितले. याच अनुषंगाने बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ३० ऑक्टोबर रोजी एक आदेश काढला. यात त्यांनी कर्तव्यावर असताना टी-शर्ट, जीन्सचा वापर करू नये असे म्हटले आहे. परंतू ८ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार सुरूवातीला टी-शर्ट, जीन्स वापरू नये असे म्हटले होते. परंतू त्याच दिवशी पुन्हा सुधारीत निर्णय निघाला. यात केवळ टी-शर्ट वापरू नये असे स्पष्ट म्हटले आहे. असे असतानाही बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी जीन्स वापरावर बंदी घालणारा आदेश काढल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून या प्रकाराबाबत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता हा आदेश बदलतात की तसाच ठेवला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
चुकीचा आदेश
शासन निर्णयात केवळ टी-शर्ट वापरावर बंदी घातलेली आहे. परंतू जीन्स वापरू नये, असे कोठेच उल्लेख नाही. असा आदेश जर काढला असेल तर चुकीचे आहे.असे आदेश स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत. याबाबत आम्ही निवेदन देऊन आवाज उठवू.
- डॉ.नितीन मोरे, कार्याध्यक्ष मॅग्मो संघटना बीड
माहिती घेत आहे
या आदेशाबाबत समजले आहे. परंतू त्यात काय काय उल्लेख केला आहे, याची माहिती घेऊन तुम्हाला प्रतिक्रिया देते.
- डॉ.कमल चामले, उपसंचालक लातूर