बीड जिल्ह्यात हजारामागे ३० तरूण नैराश्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:23 AM2018-08-09T00:23:37+5:302018-08-09T00:24:42+5:30
कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. आतापर्यंत अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यात प्रेरणा प्रकल्पाला यश आले आहे. तरूणांबरोबरच शेतकरी व इतर नैराश्यात असलेल्या रुग्णांना प्रेरणा प्रकल्पात समुपदेशन करून उपचार केले जात आहेत.
प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक तीन महिन्याला आशा स्वयंसेविकांमार्फत सर्व्हेक्षण केले जाते. प्रत्येकाच्या घरी जात त्यांच्या घरात किती लोक तणावाखाली आहेत, याची माहिती घेतली जाते. जे लोक तणावात आहेत, अशांना तात्काळ १०४ या क्रमांकावर संपर्क करून देत त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील रुग्णाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मनपरिवर्तन केले जाते.
शेतकरीही तणावाखाली
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात एक लाखामागे २३४ शेतकºयांना (२०१७ ची आकडेवारी) नैराश्याच्या विळख्यात अडकलेले आहेत.
या शेतक-यांचेही समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत.
आष्टी तालुक्यात सर्वाधिक संख्या
आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ८५ रूग्ण तणावग्रस्त आढळून आले आहेत.
त्यापाठोपाठ अंबाजोगाई (४९) अािण शिरूरकासार (२३) या तालुक्यांचा क्रमांक लागतो.
बीड, धारूर, केज, माजलगाव, परळी, पाटोदा व वडवणी येथे एकही तीव्र नैराश्यात असलेला रूग्ण नसल्याचा अहवाल आशा स्वयंसेविकांनी प्रेरणा प्रकल्पाला दिला आहे.
२० ते ३० वर्षांतील तरुणांमध्ये सर्वाधिक नैराश्य
नैराश्यात असलेले सर्वाधिक तरूण हे २० ते ३० वयोगटातील आहेत. तसेच मागील काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि पुढील प्रवेशासाठी होणारी अडवणूक यामुळे काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी प्रकरणे येताच प्रेरणा प्रकल्पाकडून कुटुंब व पीडितांची तात्काळ भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना आत्महत्येपासून
दूर करण्यामध्ये यश आले आहे.
तो म्हणतो.. आता आत्महत्या नको रे बाबा...
साधारण महिन्यापूर्वी एक रुग्ण या प्रकल्पात आला होता. सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा होती. परंतु घरच्यांनी नकार दिला. यामुळे त्याने रागाच्या भरात काचेने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर लगेच त्याचे समुपदेशन करण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाची टीम पोहोचली. मुलासह त्याच्या कुटूंबियांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही केला. आज तोच तरूण रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप करीत आहे. आता आत्महत्या करणार नाही, असे तो सांगत आहे. अशाच अनेक तरूणांचे मनपरिवर्तन करण्यात पे्ररणाच्या टिमला यश आले आहे.
ग्रामीणपेक्षा शहरात प्रमाण आधिक
ग्रामीण भागात १०० मागे दोन ते तीन तरूण नैराश्यात आहेत. शहरात १०० मागे तीन ते चार तरूण नैराश्यग्रस्त असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ही टिम घेतेय परिश्रम
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल आॅफिसर सुदाम मोगले, डॉ. मोहंमद मुजाहेद, समुपदेशक अशोक मते, सामाजिक कार्यकर्ता अंबादास जाधव, परिचारिका प्रियंका भोंडवे, शीतल टाक, लेखापाल महेश कदम ही टीम या प्रकल्पात कार्यरत आहेत. समुपदेशन, उपचार आणि सर्व्हेक्षणाचा आढावा हे करीत आहेत. सध्या त्यांचे काम उत्कृष्ट सुरू आहे.