वृक्ष लागवडीत बीड जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:29 AM2018-08-11T00:29:55+5:302018-08-11T00:30:40+5:30
एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष, हे ब्रिदवाक्य घेऊन हाती घेतलेली वृक्ष लागवडीची चळवळ यावर्षी बीड जिल्ह्यात आधिक घट्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बीड जिल्ह्याला ३३ लाख वृक्ष लागवडचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करून बीड जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष, हे ब्रिदवाक्य घेऊन हाती घेतलेली वृक्ष लागवडीची चळवळ यावर्षी बीड जिल्ह्यात आधिक घट्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बीड जिल्ह्याला ३३ लाख वृक्ष लागवडचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करून बीड जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला.
जादा वृक्ष लागवड करण्यात वनविभागाला यश आले. यावर्षी यावर्षीपासून तूतीच्या झाडांची गणना देखील वृक्ष लागवडीमध्ये करण्यात आल्याने जिल्ह्यात ४७ लाख झाडांची नोंद झाली आहे. तुतींची ४७ आणि उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ३३ लाख ५० हजार झाडे वनविभागाने लावले. असे एकून ८२ लाख ४२ हजार वृक्षांची लागवड जिल्ह्यात झाली आहे.
शाळा, महाविद्यालये, कार्यालये, संस्था, संघटनांनी पुढाकार घेतल्याने हे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यामुळे औरंगाबाद, नांदेड नंतर बीड जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी राहिला. २०१६ पासून राज्यात वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेण्यात आली. २०१६ साली १ कोटी, २०१७ साली ३ कोटी तर २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जुलै महिन्यात ही वृक्ष लागवड करण्यात आली. मागील तीनही वर्षांत बीड जिल्ह्याने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहज पूर्ण केलेले आहे. लावलेले झाडे जगविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.
बोडख्या डोंगररांगा हिरवाईने नटवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून पोषक वातावरण व मृदेची प्रत पाहून विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. विविध रोपवाटिकांमध्ये तब्बल २५ लाख रोपे यावर्षी तयार केली होती. ही रोपे सर्व शासकिय, निमशासकीय कार्यालयांसह संघटना, शाळा, महाविद्यलये व इतरांना वाटप करण्यात आली. तसेच ते लावण्यांसंदर्भात आवाहनही करण्यात आले होते. सर्वांनी या वृक्ष लागवडीसाठी हात पुढे केल्याने जिल्ह्याने तीनही वर्षांतील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
यासाठी विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए.ए. धानापुणे, सहायक वन संरक्षक एल.पी. मगर, जी.एस.साबळे यांच्यासह वनिकरणची सर्व टीम, वनविभागाची टीम, तालुक्यातील सर्व वन परिक्षेत्र अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
२५ टेकड्यांवर ६४०० झाडे
वृक्ष लागवड करण्यासाठी विविध उपक्रम वनविभागाच्या माध्यमातून राबवण्यात आले. यामध्ये हरीत टेकडी उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ३८ टेकड्यांवर ६ लाख ४ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
‘माझी शाळा माझी टेकडी’ या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील टेकड्यांवर रोपे लावली. यात २५ टेकड्यांवर ६ हजार ४०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा मुळ उद्देश शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात यावे, त्यांनी लागवलेल्या रोपांची ते स्वत: काळजी घेत असल्यामुळे निसर्गाशी त्यांचे नाते अधिक घट्ट होईल, यासाठी हा उपक्रम शाळा, महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात आला होता.
या झाडांची झाली लागवड
जिल्ह्यात विविध जाती, प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये कडू निंब, बांबू, सिताफळ, जांभूळ, करंज, आवळा, वड, पिंंपळ, पिंपरण, नांदुरकी, काशिद, गुलमोहर, जांभूळ आदी झाडांचा समावेश आहे.
यावर्षीपासून तुतीची गणना
तुती लागवडीची गणना यावर्षीपासून वृक्ष लागवडीमध्ये केली आहे. जिल्ह्यातील ८५० लाभार्थी शेतकºयांनी ४७ लाख तुतीची लागवड व संगोपन केले आहे. यातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
अनेक शासकीय कार्यालयांचे दुर्लक्ष
काही शासकिय कार्यालयांनी वृक्ष लागवड चळवळीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तर काहींनी केवळ सरकारी काम समजून वृक्ष लागवड केली आहे. ते जपण्यासाठी त्यांच्याकडून कसलेच प्रयत्न केले जात नाहीत. या सर्वांचा आढावा घेण्याची गरज व्यक्त होत आहे. काही कार्यालयांनी मात्र झाडांची योग्य निगा राखली आहे. त्यामुळे झाडे डौलत आहेत.
तीन महिन्याला आढावा घेण्याची गरज
जिल्ह्यात लावलेले वृक्ष जगले आहेत का?, त्यांना वेळेवर पाणी दिले जाते का? नियुक्त कर्मचारी लक्ष देतात का? लावलेल्या झाडांची आकडेवारी केवळ कागदावर तर नाही ना? यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी वनविभागाने प्रत्येक तीन महिन्याला या परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. असे झाले तर दबाव निर्माण होऊन जास्तीत जास्त झाडे जगतील.
रोपे टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू
पावसाने ओढ दिल्याने लावलेले वृक्ष जगविण्याचे वनविभागासमोर आव्हान आहे. हे रोपे टिकवण्यासाठी विभागाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.
तसेच जमिनीमधील ओलावा टिकून रहावा यासाठी झाडाच्या भोवती गोलाकार माती ओढून लावण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी साठवण तलाव तयार केले आहेत. तेथे साठलेले पाणी सौरपंपाच्या माध्यमातून झाडांना दिले जात आहे. तसेच टँकरचा देखील वापर केला जात आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करणाºया विविध संघटनांनी सहभाग नोंदवत झाडे जगवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करत बीड जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेतही राष्टÑीय पातळीवर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला होता. पंतपधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जिल्हाधिकारी एम.डी.सिंग यांचा सत्कारही झाला होता. वृक्षारोपणात जिल्ह्यास मिळालेल्या तिसºया क्रमांकाबद्दल बोलताना सिंग म्हणाले की, विकास आणि वनक्षेत्राचा जवळचा संबंध आहे. प्रगत राष्टÑात उद्योगाइतकेच वनक्षेत्र वाढीसाठी प्राधान्य दिले जाते. वनक्षेत्र वाढले तर पर्यावरण, पर्जन्यमान चांगले राहील, यासर्व गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. पर्यावरणाचे कठोर नियम आहेत. प्रगत राष्टÑात या नियमांचे उद्योग कंपन्या देखील काटेकोरपणे पालन करतात, परंतु, ह्याच कंपन्या जेव्हा भारतात येतात, तेव्हा हेच नियम पाळत नाहीत. कारण काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तेवढी सक्षम नाही. वृक्षारोपण मोहिमेत वनखात्याने उत्कृष्ट काम केले आहेच, परंतु, महसूल, शिक्षण विभागासारख्या इतर विभागांनीही आपले योगदान दिल्यामुळे हे यश मिळाले आहे.
- एम. डी. सिंग
जिल्हाधिकारी
सद्यस्थितीत लावलेली झाडे जगवण्यासाठी आमच्याकडून सर्व प्रयत्न सुरू आहेत. यासाठी टँकर, तुषर सिंचन, सौरपंपाची सोय केली आहे. आमचे तर प्रयत्न सुरूच आहेत, परंतु या कार्यात विविध सामाजिक संघटनांनी, पर्यावरणवादी संस्थांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधीलकी जपत झाडे जगवण्यासाठी सहकार्य करावे.
- अमोल सातपुते
विभागीय वन अधिकारी,
वनविभाग बीड