चारित्र्यावर संशय घेऊन बीड जिल्ह्यात पत्नीवर कु-हाडीचे घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:13 AM2018-05-09T00:13:05+5:302018-05-09T00:13:05+5:30
चारित्र्यावर संशय घेत व मेव्हण्याने पैसे न दिल्याने आपल्या पत्नीवर कु-हाडीचे घाव घातले. त्यानंतर पती स्वत:हून रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी पोलीस ठाण्यात हजर झाला. तर जखमी महिलेला नातेवाईकांनी प्रथम बीड व नंतर औरंगाबादला उपचारासाठी दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : चारित्र्यावर संशय घेत व मेव्हण्याने पैसे न दिल्याने आपल्या पत्नीवर कु-हाडीचे घाव घातले. त्यानंतर पती स्वत:हून रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी पोलीस ठाण्यात हजर झाला. तर जखमी महिलेला नातेवाईकांनी प्रथम बीड व नंतर औरंगाबादला उपचारासाठी दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जखमी महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून हल्लेखोर पतीवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नमाला चंद्रकांत भोसले (३५) असे जखमी महिलेचे नाव आहे. झापेवाडी येथील रहिवासी चंद्रकांत दत्तू भोसले हा रत्नमाला यांच्यासोबत पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे शेतकामासाठी रहात होता. तेथे दोघांत भांडण झाले. त्यानंतर चंद्रकांत हा गावाकडे निघून आला. नंतर रत्नमाला यांचा भाऊ परसराम पाचपोते याने त्यांना झापेवाडी येथे आणले. भांडण करू नका नसता पोलिसांत तक्रार देईल, असे सुनावल्याने दोघेही थोडे घाबरले होते. त्यानंतर चंद्रकांत याने विघ्नवाडी येथे जाऊन मेव्हणा परसराम पाचपोते याच्याकडे खायला धान्य व रोख पाच हजार रूपयांची मागणी केली. मेव्हण्याची परिस्थितीही हलाखीची असल्याने त्याने केवळ बाजरी, ज्वारी असे धान्य दिले व पैसे नाहीत, असे सांगितले.
याचा राग चंद्रकांतच्या मनात होता. त्यातच पत्नीच्या चारित्र्यावरही तो संशय घेत होता. याचाच राग मनात धरून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात चंद्रकांतने घरात बाजूलाच पडलेली कु-हाड घेऊन रत्नमाला यांच्यावर घाव घातले. घाव रोखत असताना त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली. तरीही चंद्रकांत याने कुठलीही तमा न बाळगता पुन्हा पोट, मान, गाल व हातावर एकामागून एक आठ घाव घातले. यामुळे रत्नमाला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात घरातच पडल्या. हा सर्व प्रकार त्यांचा मुलगा राहुल (वय १५) याने पाहिला. त्याने आरडाओरडा केली व मामा परसराम यांना फोनवरून कळविले. त्यांनी लगेच येऊन ग्रामस्थांच्या मदतीने रत्नमाला यांना बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. परंतु कु-हाडीचे घाव खोलवर गेल्याने त्यांची प्रकृती जास्तच चिंताजनक बनली होती. त्यामुळे डॉक्टरांनी औरंगाबादला हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, पत्नीवर प्राणघातक हल्ला करताना चंद्रकांतचे कपडे रक्ताने माखले होते. त्याच अवस्थेत तो शिरूर ठाण्यात स्वत:हून हजर झाला आणि घडला प्रकार सांगितला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक आपल्या चमूसह घटनास्थळी गेले, पंचनामा केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेबूब काझी यांनीही महिलेची भेट घेतली. परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिचा जबाब घेता आला नाही. रत्नमाला यांचा भाऊ परसराम याच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली व रक्ताने माखलेली कु-हाड जप्त केली आहे. तपास फौजदार काझी करीत आहेत.
समजावून सांगण्याचे प्रयत्न ठरले निष्फळ
दोन महिन्यांपूर्वी पती-पत्नीत वाद झाल्यावर रत्नमाला यांचा भाऊ व इतर नातेवाईकांनी दोघांनाही समजावून सांगितले होते. भांडण न करता सुखाने संसार करण्याचा सल्ला दिला.
काही दिवस त्यांनी भांडण केले नाही. परंतु चंद्रकांत हा रत्नमाला यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याचा राग त्याच्या मनात होता. त्यामुळे नातेवाईकांनी समजावल्यानंतरही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी त्याने हा राग अशा क्रूर कृत्याने व्यक्त केला.