बीड जिल्हा होणार पाणीदार; २३५ गावांत होणार कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:08 AM2018-04-04T00:08:53+5:302018-04-04T00:08:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात उन्हाळ््याचे दिवस आले की टँकर युक्त जिल्हा होत असे. मात्र, ‘जलयुक्त शिवार’ ही योजना शासनाने प्रभावीपणे राबवल्यामुळे बीडची वाटचाल दुष्काळमुक्त जिल्ह्याच्या दिशेने होताना दिसत आहे. याच योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्यावर्षी १९५ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही गावे जलयुक्त झाली व पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळाले. यावर्षी देखील शासनाने जिल्ह्यात भरीव तरतूद केली आहे. २०१८-१९ या वर्षात २३५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यात बीड जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून झाली होती. नागरिकांना उन्हळ््याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शेतीसाठी देखील पुरेसे पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली होती. या प्रश्नांवर उपाय म्हणून शासन व इतर सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संघटनांनी पुढे येत जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली, त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली.
यावर्षी देखील जिल्ह्यात शासनाने जलयुक्त योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करत संपूर्ण जिल्हा पाणीदार होण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. त्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शेती फायद्याची ठरत आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाणी साठ्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाणीटंचाई भासणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.