बीड: आमदारांचे घराणे! मुंडे अन् पंडित सर्वात पुढे; क्षीरसागर, सोळंकेही प्रत्येकी ६ वेळा आमदार
By सोमनाथ खताळ | Published: October 22, 2024 12:13 PM2024-10-22T12:13:06+5:302024-10-22T12:15:04+5:30
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत तरी घराणेशाही स्पष्ट दिसून आली आहे
सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत तरी घराणेशाही स्पष्ट दिसून आली आहे. परळीचे मुंडे, गेवराईच्या पंडित घराण्यातच आतापर्यंत सार्वाधिक आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही घरांमध्ये मंत्रिपदे आलेली आहेत. त्या पाठोपाठ बीडचे क्षीरसागर आणि माजलगावचे सोळंके कुटुंबही मागे नाही. यांनीही आमदारकीसह मंत्रिपद मिळविलेले आहे.
१९६२ नंतर ८९ आमदार झाले आहेत. यामध्ये १० महिलांना संधी मिळाली. इतर सर्व पुरुष आमदार राहिलेले आहेत. यात सर्वांत अव्वल क्रमांकावर परळीचे मुंडे कुटुंब आहे. त्यांनी परळी आणि रेणापूर अशा दोन मतदारसंघांतून आठ वेळा गुलाल उधळला आहे. गेवराईच्या पंडितांनीही ७ वेळा गुलाल उधळत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
मुंदडा सलग ५ वेळा आमदार
केज मतदारसंघातून विमल मुंदडा या सलग पाच वेळा आमदार झालेल्या आहेत. यामध्ये त्यांनी आरोग्यमंत्रिपदही सांभाळले होते. त्यानंतर, २०१९ मध्ये त्यांची सून नमिता मुंदडा आमदार झाल्या व आता दुसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
कोणत्या कुटुंबात किती आमदार झाले?
- गेवराई: पवार कुटुंब - ४, पंडित कुटुंब - ७
- माजलगाव: सोळंके कुटुंब - ५
- बीड: क्षीरसागर कुटुंब - ३
- चौसाळा: क्षीरसागर कुटुंब - ३
- आष्टी: धस कुटुंब - ३, धोंडे कुटुंब - ४
- केज: मुंदडा कुटुंब - ६, सोळंके कुटुंब - १
- परळी: मुंडे कुटुंब - ३
- रेणापूर : मुंडे कुटुंब - ५
चार वेळा आमदार, दोन वेळा खासदार
- गोपीनाथ मुंडे हे रेणापूर मतदारसंघातून १९८० साली पहिल्यांदा आमदार झाले. दुसऱ्या टर्मला पंडितराव दौंड आमदार झाले. त्यानंतर सलग ४ वेळा मुंडे आमदार राहिले.
- २००९ नंतर परळीतून मुलगी पंकजा मुंडे सलग दोन विजय मिळविले. २०१९ साली त्यांचा पराभव, तर धनंजय मुंडे विजयी झाले.
- २००९ सालीच गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले.
- २०१४ मध्येही त्यांनी विजय मिळविला. त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळाले. दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे डॉ. प्रीतम मुंडे खासदार झाल्या.
- २०१९ मध्येही डॉ. मुंडेच खासदार होत्या. २०२४ ला पंकजा यांना संधी मिळाली, परंतु बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला.