Beed: वरबाप म्हणतात, बालविवाह नव्हे तो साखरपुडा, समितीने फोटो दाखवून केला भंडाफोड, मुलगा, मुलीच्या आई-वडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा
By सोमनाथ खताळ | Published: October 25, 2023 10:30 PM2023-10-25T22:30:38+5:302023-10-25T22:31:04+5:30
Beed: भवानवाडी येथील २१ वर्षीय मुलाचा विवाह कारेगव्हाण येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झाला. या विवाहाची कोणालाही माहिती होऊ दिली नाही; परंतु काही लोकांनी याचे फोटो बालकल्याण समितीला पाठविले.
- सोमनाथ खताळ
बीड - २१ वर्षांच्या मुलासोबत अवघ्या नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा विवाह लावण्यात आला. बालकल्याण समितीकडे पुरावे येताच ग्रामसेवकाला चौकशीसाठी पाठविले. मुलगी व मुलगा या दोघांच्या आई-वडिलांना विचारणा केली. त्यांनी हा विवाह नसून केवळ साखरपुडा झाल्याचे सांगितले; परंतु समितीने दिलेले फाेटो दाखवताच त्यांचा भंडाफोड झाला. हा प्रकार बीड तालुक्यातील भवानवाडी येथे २६ सप्टेंबर रोजी घडला होता. यात २५ ऑक्टोबर राेजी पालकांसह वऱ्हाडींवर व पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भवानवाडी येथील २१ वर्षीय मुलाचा विवाह कारेगव्हाण येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झाला. या विवाहाची कोणालाही माहिती होऊ दिली नाही; परंतु काही लोकांनी याचे फोटो बालकल्याण समितीला पाठविले. समितीने ग्रामसेवकामार्फत गावात जाऊन चौकशी केली, तर मुलगा व मुलीच्या वडिलांनी हा विवाह झालाच नाही, असा पवित्रा घेतला. केवळ साखरपुडा झाल्याचा दावा त्यांनी केला; परंतु ग्रामसेवकांनी समितीने पाठविलेले फोटो दाखविताच सर्वच शांत झाले. आपला भंडाफोड झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विनंती केली; परंतु समितीचा आदेश असल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामसेवकांनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी ग्रामसेवक रवींद्र सातपुते यांच्या फिर्यादीवरून नवरदेवासह त्याचे आई-वडील व मुलींचे आई-वडील आणि वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती हे करत आहेत.