रात्री बारानंतरही बीडचे अग्निशमन कार्यालय अलर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:41 AM2021-09-16T04:41:20+5:302021-09-16T04:41:20+5:30
रियालिटी चेक अग्निशमन विभाग कार्यालय @ 1:10 am बीड : तीन लाखांकडे वाटचाल करणारी लोकसंख्या आणि विस्तारत असलेल्या बीड ...
रियालिटी चेक
अग्निशमन विभाग कार्यालय @ 1:10 am
बीड : तीन लाखांकडे वाटचाल करणारी लोकसंख्या आणि विस्तारत असलेल्या बीड शहरातील अग्निशमन दल रात्री बारानंतरही अलर्ट असल्याचे दिसून आले. फायर कॉलची प्रतीक्षा आणि आग नियंत्रण व बचावकार्यासाठी सहा कर्मचारी तत्पर असतात. मात्र शहराच्या तुलनेत अग्निशमन दलात पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. तरीदेखील लगतच निवास असणारे पाच कर्मचारी २४ तास संपर्कात असतात. त्यामुळे कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी अडचणी आलेल्या नाहीत.
दलाकडील तिन्ही वाहने सु्स्थितीत आहेत. अग्निशमन दलाच्या लँडलाईन फोनवर संपर्क करताच कॉल करणाऱ्याचे नाव, घटनास्थळाचा पत्ता आणि घटनेचे स्वरूप याची संक्षिप्त महिती घेतात. इलेक्ट्रिक बेल वाजविली जाते. क्षणात हजर होणारे कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना होतात. शहरातील काही भागात गल्ली व अरुंद रस्त्यांमुळे अनेकदा वाहन नेण्यात अडचणी येतात. त्यावेळी पर्यायी मार्ग वापरावे लागतात. तसेच एकाच कालावधीत दोनपेक्षा जास्त घटना घडल्यास कर्मचारी आणि वाहने अपुरी पडतात. त्यामुळे आपत्तीप्रसंगी बीडकरांचा बचाव आणि रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलात वाढीव मनुष्यबळाची गरज आहे.
१) तयार स्थितीत तीन बंब
शहरातील राजुरी वेसजवळ कटकटपुरा, बुंदेलपुरा रोडवरील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालय परिसरात भेट दिली. या रस्त्यावर काही पथदिवे बंद, तर काही सुरू होते. कार्यालयात एक कर्मचारी हजर व जागा होता. फायर कॉल कधीही येऊ शकतो, म्हणून ड्युटीवर तो जागा असल्याचे दिसून आले. दलाकडे असलेली सर्व ३ वाहने तयार स्थितीत होती.
२) चालकासह पाच कर्मचारी २४ तास संपर्कात
अग्निशमन दलाकडे सध्या उपलब्ध १३ कर्मचाऱ्यांपैकी चालकासह असलेले पाच कर्मचारी लगतच असलेल्या क्वार्टरमध्ये २४ तास संपर्कात असतात. फायर कॉल येताच संबंधित कर्मचारी फायर बेल वाजवितो. तीन ते पाच मिनिटात हजर होऊन पहिले वाहन कॉलच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसह पोहोचते.
३) एकच कर्मचारी जागा
बीडच्या अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर हे दल कर्तव्य बजावते. या कार्यालयाला भेट दिली असता, एक कर्मचारी रात्रपाळीला असल्याचे पाहायला मिळाले. शिफ्टप्रमाणे त्यांची ड्युटी ठरवून दिलेली असते. इतर कर्मचारी क्वार्टरमध्ये कुटुंबासह राहतात. कॉलनंतर मोजक्याच मिनिटात ते हजर होतात. काही कर्मचारी शहरात इतरत्र राहतात. घटनेच्या स्वरूपानुसार त्यांना संपर्क करून बोलावले जाते.
४) नियम काय सांगतो?
फायर बेल वाजताच २४ तास संपर्कातील कर्मचाऱ्यांनी अलर्ट राहून युनिफाॅर्म, पीपीई कीटसह तत्काळ हजर राहणे आवश्यक आहे. वाहने सुस्थितीत असली पाहिजेत. यासाठी दररोज सकाळी ९ वाजता आणि रात्री ८ वाजता वाहनांचेदेखील रोलकॉल होतात. त्यावेळी वाहनाचे ऑईल, इंधन, पाणी, टायर पंक्चर वा कसे... याची पाहणी केली जाते. आग वा पूर किंवा कोणतीही दुर्घटना असेल, तर कॉल येताच इलेक्ट्रॉनिक फायर बेल वाजताच घटनास्थळी ताबडतोब पोहोचण्याबाबत नियम आहे.
५) परिस्थिती कशीही असो, आम्ही अलर्टच...
बीड अग्निशमन दलाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. तरीही उपलब्ध मनुष्यबळावर आमचे कर्मचारी अलर्ट असतात. फायर कॉल नोंद होताच तत्परतेने वाहनासह घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणून बचावकार्य करतात. वाढीव कर्मचाऱ्यांसाठी नगरपालिकेकडे मागणी केलेली आहे. शासनानेही शहरांचा विस्तार लक्षात घेता, भरती केल्यास ताण कमी होऊ शकतो.
- बी. ए. धायतडक, अग्निशमन विभागप्रमुख.