बीडमध्ये हद्दपार जुगाऱ्याने पोलिसांना चकवले; आठ वर्षानंतर प्रकार आला चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 04:37 PM2019-04-10T16:37:27+5:302019-04-10T16:41:06+5:30
हद्दपार असतानाही बीड जिल्ह्यात खुलेआम वावर
बीड : माजलगाव शहरात जुगार चालविणाऱ्याने चक्क पोलिसांनाच घुमविल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी समोर आला आहे. खोटे नाव सांगून आठ वर्षांपासून तो शहरात वावरत आहे. हद्दपार असतानाही शहरात वावरताना आढळल्याने विशेष पथकाने कारवाई केली. चौकशी केल्यानंतर हा खोटा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यानंतर त्याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आठ वर्षांपासून आरोपी खोटे नाव सांगत असतानाही माजलगाव पोलिसांना याचा थांगपत्ता नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मधुसुदन प्रभाकर डोळ (४८ रा.माजलगाव) असे त्या फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मधुसदनने संजय नावाचे खोटे मतदान कार्ड तयार करून घेतले. तो जुगारी गुन्हे करण्याच्या वृत्तीचा आहे. २००८ साली त्याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात पहिला गुन्हा नोंद झाला. तेव्हाही त्याने आपण संजय प्रभाकर डोळ असे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याच्यावर २०१५ पर्यंत विविध असे ७ गुन्हे दाखल झाले. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याची पार्श्वभूमि तपासून त्याला २ फेब्रुवारी २०१७ साली बीड जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. मे महिन्यात हा आदेश डोळ याला तामील करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळीही त्याचे नाव संजय असेच होते. मधुसुदनचा उल्लेख कोठेही नव्हता.
दरम्यान, हद्दपार असतानाही डोळ हा माजलगाव शहरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यावरून विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृृष्ण सागडे यांनी मंगळवारी शहरात सापळा लावला. गणेश नवले, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, रेवननाथ दुधाने, जयराम उबे यांनी त्याला दुपारच्या सुमारास ताब्यात घेतले. यावेळी त्याने आपण संजय नसून मधुसुदन असल्याचे सांगितले. संजय हा कोल्हापूरला असल्याचे सांगितले. सागडे यांनी विश्वासात घेऊन उलट तपासणी केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून शहर पोलिसांना दिला. त्यावरून पोउपनि रमेश जाधवर यांच्या फिर्यादीवरून डोळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोनि सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बिराजदार हे तपास करीत आहेत.
चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल
हद्दपार केलेल्या आरोपी जिल्ह्यात वावरत असताना कारवाईचे आदेश आल्याने माजलगावात एकाला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ आढळलेल्या कागदपत्रांवरून तो खोटे बोलत असल्याचे समोर आले. याचा अहवाल तयार करून कारवाईस्तव माजलगाव शहर पोलिसांना दिला आहे. चौकशी करून पुढील कारवाई ते करतील. याबाबत पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना कळविले आहे.
- रामकृष्ण सागडे, प्रमुख, विशेष पथक बीड जिल्हा