...पुन्हा एक नकुशी रुग्णालयाच्या कचराकुंडीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:38 AM2020-10-06T02:38:31+5:302020-10-06T02:38:38+5:30
अंबाजोगाईत खळबळ; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान
अंबाजोगाई (जि. बीड) : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात पुन्हा एका स्त्री अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून कचराकुंडीत फेकल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुरक्षा रक्षकाने ती पिशवी पाहिल्याने त्या अर्भकाला जीवदान मिळाले असून ती ‘नकुशी’ सध्या रूग्णालयातील बालकक्षात उपचार घेत आहे.
‘स्वाराती’ परिसरात एका कचराकुंडीत हे अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत घालून निर्दयी मातेने फेकून दिले. रूग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाची नजर कचराकुंडीकडे गेल्याने त्याला संशय आला. पिशवी पाहिल्यावर त्याला अर्भक दिसले. ते अर्भक त्याने रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ते जीवंत दिसल्याने लगेच उपचार सुरू करण्यात आले. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिलेले आहेत. आमच्या रुग्णालयातील हे बाळ नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर खरा प्रकार समजेल. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याच् अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांनी सांगितले.
नकुशी समजून टाकलेल्या अर्भकाचा मृत्यू
औरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि आईने नकोशी समजून शेतात फेकलेल्या टुणकी (जि. औरंगाबाद) येथील बाळाने औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. जन्मानंतर लगेच आईच्या कुशीला मुकलेल्या या बाळाची गेल्या ६ दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. ही झुंज अपयशी ठरली.
पाच मुलींनंतर सहाव्यांदाही मुलगी झाल्याचा समज करून या बाळाला मातेनेच शेतात फेकून दिल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली; परंतु गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याच्या चचेर्नंतर हे नवजात बाळ माझेच असल्याचे मातेने म्हटले. बाळाचे वजन केवळ १२०० ग्रॅम होते.
घाटीत दाखल झाल्यापासून प्रकृती चिंताजनक असल्याने बाळाला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले होते. जंतुसंसर्ग झाल्याने कृत्रिम आॅक्सिजनही देण्यात येत होता. प्रकृती अधिकच खालावल्याने सोमवारी पहाटे ५.२० मिनिटांनी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.