ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांना अटक
By सोमनाथ खताळ | Published: June 7, 2024 07:37 PM2024-06-07T19:37:32+5:302024-06-07T19:37:52+5:30
पुण्यातून घेतले ताब्यात : बीड जिल्ह्यात नऊ गुन्हे दाखल
बीड : ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या. नंतर त्या परत न दिल्याने ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल होते. याच अनुषंगाने बीडपोलिसांनी सुरेश कुटे यांना शुक्रवारी पहाटे पुण्यातील हिंजवडी भागातून अटक केली आहे. त्यांना सध्या माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
बीडसह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, आदी जिल्ह्यांत ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ५२ शाखा आहेत. यामध्ये सहा लाखांपेक्षा अधिक ग्राहक असून, कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये कुटे ग्रुपच्या तिरूमला ग्रुपची आयकर विभागाकडून तपासणी झाली. त्यानंतर ठेवीदारांनी घाबरून ज्ञानराधामधील ठेवी काढून घेतल्या; परंतु मल्टिस्टेटमधील पैसे संपल्याने या ठेवी परत देण्यात कुटे असमर्थ ठरले. पैसे परत देण्यासह सुरेश कुटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठेवीदारांनी आंदोलने केली; परंतु तरीही काहीच कारवाई झाली नव्हती. अखेर ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर गुन्हे दाखलचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, गुन्हे दाखल झाल्यानंतरही कुटे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून परदेशातून पैसे येत असल्याचे आश्वासन दिले जात होते. परंतु प्रत्यक्षात काहीच प्रगती दिसत नसल्याने ठेवीदार आक्रमक होत होते. पोलिसांकडूनही अनेकदा या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते; परंतु ठेवीदारांचा वाढता रोष पाहून त्यांनी शुक्रवारी पहाटे सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना पुण्यातून ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. प्राथमिक चौकशी करून त्यांना माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दोन दिवसांत पैसे देणार : कुटे
सुरेश कुटे यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातून माजलगावकडे नेत असताना त्यांना ठेवीदारांनी आमच्या पैशांचे काय? असा सवाल केला. यावर ‘घाबरू नका, मी दोन दिवसांत तुमचे सर्वांचे पैसे देतो, असे सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना सांगितले. यावेळी ठेवीदारांची माेठ्या संख्येने उपस्थिती होती.
सुरेश कुटेसह एका संचालकाला अटक केली आहे. त्यांना सध्या माजलगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दिले आहे. पोलिस कोठडी आणि इतर तपास केला जाईल. अर्चना कुटे यांना अटक केलेली नाही - नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड