बीड अवैध गर्भपात प्रकरण: जालन्यातील डॉक्टर सतीश गवारेचा बीड पोलिसांच्या कोठडीत ४ दिवस मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 08:02 PM2022-06-25T20:02:07+5:302022-06-25T20:02:21+5:30

अवैध गर्भपात प्रकरण : सोनोग्राफी मशीन किती लोकांना पुरविल्या? याचा शोध घेण्याचे आव्हान

Beed illegal abortion case: Doctor Satish Gaware stays in Beed police custody for 4 days | बीड अवैध गर्भपात प्रकरण: जालन्यातील डॉक्टर सतीश गवारेचा बीड पोलिसांच्या कोठडीत ४ दिवस मुक्काम

बीड अवैध गर्भपात प्रकरण: जालन्यातील डॉक्टर सतीश गवारेचा बीड पोलिसांच्या कोठडीत ४ दिवस मुक्काम

Next

- सोमनाथ खताळ
बीड :
बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात जालना येथील डॉ. सतीश गवारे याला गुरुवारी (दि. २३) रात्री कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला शुक्रवारी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने सतीश सोनवणेसारख्या किती लोकांना सोनाेग्राफी मशीन पुरविल्या? तसेच किती ठिकाणी अवैध गर्भपात केले? यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे आदी प्रश्नांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बीड तालुक्यातील बकरवाडी येथील शीतल गाडे या महिलेचा ५ जून रोजी अवैध गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. यात पिंपळनेर पोलीस ठाण्यात सासरा, पती, भाऊ, लॅबचालक, सीमा मावशी, शिकाऊ डॉक्टर, एजंट यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. यातील सीमाने आत्महत्या केली होती, तर बाकी सर्व आरोपी बीडच्या कारागृहात आहेत. यातील शिकाऊ डॉक्टर सतीश सोनवणेने जालन्याच्या डॉ. सतीश गवारे याच्याकडूनच गर्भपात करण्याचे शिकल्याची कबुली दिली होती. डॉ. गवारे आणि सोनवणे याने गेवराईतील एजंट मनीषा सानपच्या घरी येऊन गर्भलिंग निदान केले होते. यासाठी वापरलेली सोनोग्राफी मशीन ही गवारेची असल्याचे सोनवणेने लेखी दिले होते. याच मुद्द्याला धरून बीड पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने गवारेला जालना येथील कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या चार दिवसांत साखळी उघड करण्यासाठी पोलिसांनी प्रामाणिक तपास करावा, एवढ्या दिवस संथ गतीने तपास होत असल्याचे आरोप पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गवारेकडून या प्रश्नांची मिळावीत उत्तरे?
गर्भलिंग निदान कधीपासून सुरू आहे? किती महिलांची तपासणी केली?, सतीश सोनवणेसारखे किती लोक सोबत होते? मनीषा सानपसारखे किती एजंट कार्यरत आहेत?, आतापर्यंत किती सोनोग्राफी मशीन खरेदी केल्या? मनीषाकडे जशी मशीन सापडली तशा किती ठिकाणी मशीन आहेत? बीडच्या गेवराईप्रमाणेच राज्यातील इतर जिल्हे, तालुक्यांमध्येही गर्भलिंग निदान केले का? गवारेला कोणाचे अभय आहे का? आतापर्यंत किती महिलांचे गर्भलिंग निदान केले आणि त्या महिला कुठल्या आहेत? त्यांच्याकडून किती पैसे उकळले? केवळ लिंग निदान केले की गर्भपातपण केला? केला तर किती महिलांचा केला? स्वत: गर्भपात करत होता की सीमा मावशीसारखे काही एजंट होते? यात सरकारी यंत्रणा किंवा राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे का? एवढ्या दिवसांपासून हा गैरप्रकार चालत असताना आरोग्य विभाग काय करत होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गवारे डॉक्टरकडून मिळविण्यासाठी पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना कौशल्याचा वापर करावा लागणार आहे.

सोनोग्राफी मशीन कोणाची?
शीतलचे गर्भलिंग निदान करण्यासाठी जी सोनोग्राफी मशीन वापरली होती, ती सतीश सोनवणे याच्या घरून जप्त करण्यात आली. त्याने ही मशीन डॉ. गवारेची असल्याचे जबाबात म्हटले आहे. आता गवारे हा पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यामुळे ही मशीन कोणाची, याचा तपास लागण्याची आशा आहे. तसेच ही मशीन कोठून आली, अशा पोर्टेबल मशीन किती आहेत, त्या नोंदणीकृत आहेत की अनधिकृत, अनधिकृत असतील तर खरेदी कोठून केल्या, यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी पोलिसांनी प्रामाणिक तपास करण्याची गरज आहे.

Web Title: Beed illegal abortion case: Doctor Satish Gaware stays in Beed police custody for 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.