बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात जालन्याचा डॉक्टर ताब्यात; आरोपींची साखळी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 01:10 PM2022-06-24T13:10:06+5:302022-06-24T13:10:22+5:30
लोकमत इम्पॅक्ट: जालना कारागृहात पोहोचले बीड पोलीस
- सोमनाथ खताळ
बीड : अवैध गर्भपात प्रकरणात जालन्याच्या सतीश गवारे या डॉक्टरला बीड पोलिसांनी जालना कारागृहातून गुरुवारी रात्री ८ वाजता ताब्यात घेतले आहे. ही माहिती गुरुवारी रात्री ११ वाजता समोर आली. बीड आणि जालना न्यायालयातून यासाठी परवानगी घेण्यात आली होती. या प्रकरणात 'लोकमत'ने सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत ही कारवाई केली आहे.
बीड तालुक्यातील शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करताना ५ जून रोजी मृत्यू झाला होता. यात पिंपळनेर पोलीस ठाण्यात सासरा, पती, भाऊ, लॅबचालक, सीमा मावशी, शिकाऊ डॉक्टर, एजंट यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. यातील सिमाने आत्महत्या केली असून, बाकी सर्व बीडच्या कारागृहात आहेत. यातील शिकाऊ डॉक्टर सतीश सोनवणे हा मार्च २०२२ पासून गेवराईत एजंट मनीषा सानपच्या घरी येऊन सोनोग्राफी मशीनमधून गर्भलिंग तपासणी करत होता. यासाठी त्याला १० हजार रुपये, तर एजंट मनीषाला १५ हजार रुपये मिळत होते. हाच सोनवणे जालना येथे डॉ. गवारेकडे शिकायला होता. तेथूनच तो गर्भलिंग निदान करण्याचे शिकला.
याबाबत त्याने पोलिसांना आणि आरोग्य विभागाला तसा जबाबही दिला होता. तरीही बीड पाेलीस डॉ. गवारेला अटक करण्यासाठी आखडता हात घेत होते. याबाबत 'लोकमत'ने तपासावर आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताच बीड पोलिसांनी न्यायालयातून आदेश घेत जालना कारागृहातून रात्री उशिरा गवारेला ताब्यात घेतले. त्याला आता शुक्रवारी बीडच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. ताब्यात घेतल्याची माहिती बीडचे उपअधीक्षक संतोष वाळके यांनी 'लोकमत'ला दिली.
'लोकमत'च्या पाठपुराव्याला यश
सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या प्रकरणात 'लोकमत'ने सुरुवातीपासून आवाज उठवला. पोलिसांचा संथ तपास, आरोपींची पाठराखण, सोनोग्राफी मशीन कोणाची, याचा शोध न लावणे, आरोपींना लवकरच न्यायालयीन कोठडी मिळणे, पोलीस कोठडीत असतानाही ठोस माहिती न मिळणे, आदी मुद्दे उपस्थित केले होते. 'लोकमत'चा पाठपुरावा सुरू राहिल्यानेच बीड पोलिसांनी कारवाईला गती देत डॉ. गवारेला ताब्यात घेतले. 'लोकमत'च्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश आले असून, आणखी साखळी उघड होण्यात गवारेची मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.