बीड अवैध गर्भपात प्रकरण: जालन्याचा गवारे मास्टरमाईंड; सतीशला गेवराईत थांबवून जायचा एजंट मनीषाच्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:21 PM2022-06-22T20:21:29+5:302022-06-22T20:21:35+5:30
नियोजनबद्ध कार्यक्रम : औरंगाबादच्या शिकाऊ डॉक्टरचा आरोग्य विभागाने बीड कारागृहात जाऊन घेतला जबाब
- सोमनाथ खताळ
बीड : अवैध गर्भपात प्रकरणात जालन्याचा सतीश गवारे हाच मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याचा आरोपींत समावेश केला नसला तरी आरोग्य विभागाने त्याच्याविरोधात केस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्भलिंग निदान करणाऱ्या सतीश सोनवणे या शिकाऊ डॉक्टरचा बीडच्या कारागृहात जाऊन सोमवारी सायंकाळी जबाब घेण्यात आला आहे. यात त्याने गवारे हा आपल्याला बसस्थानकावर थांबवून मनीषाच्या घरी जात होता, असे सांगितले आहे. गर्भलिंग निदानाचा हा कार्यक्रम मनीषाच्या सहकार्याने गवारे नियोजनबद्ध करत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.
शातल गाडे या महिलेचा ५ जून रोजी अवैध गर्भपातामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा पती, सासरा, भाऊ, लॅबवाला, शिकाऊ डॉक्टर आणि सीमा नामक महिलेवर गुन्हा दाखल झाला होता. यात पोलिसांनी आरोपींची आठवडाभर पोलीस कोठडी घेतली. परंतु, हाती ठोस काहीच लागले नव्हते. पोलिसांची भूमिका पाहून आरोग्य विभागाने न्यायालयात स्वतंत्र केस दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोलिसांकडून अवश्यक कागदपत्रे घेतली. त्यानंतर सोनोग्राफी मशीन वापरणारा सतीश सोनवणे याचा सोमवारी सायंकाळी कारागृहात जाऊन जबाब घेतला. यात त्याने अनेक बाबींचा उलगडा केला आहे.
शिकाऊ डॉक्टर सतीशने काय म्हटले जबाबात?
सतीश हा औरंगाबादच्या टीव्ही सेंटर भागात राहतो. जालन्याचा डॉ. गवारे हा त्याचा पाहुणा आहे. त्यामुळे त्याची ओळख झाली. शिवाय येणे-जाणेही होते. सतीश त्याच्या खासगी दवाखान्यातही जात होता. अधूनमधून तो बीड जिल्ह्यात येत होता. परंतु, त्याला सोबत येण्यासाठी विश्वासू माणूस हवा होता. त्यामुळे तो जालन्याहून एका चारचाकी वाहनातून औरंगाबादला यायचा. औरंगाबादमधून सतीशला सोबत घेऊन गेवराईला जायचा. येथील नवीन बसस्थानकावर त्याला सोडायचा. हे येण्याआगोदरच एजंट मनीषा सानप त्यांच्या प्रतीक्षेत असायची. गवारेच्या गाडीत बसून ते दोघे मनीषाच्या घरी यायचे. सतीश हा स्थानकावरच थांबायचा. इकडे मनीषा चार ते पाच महिलांना घेऊन अगोदरच घरात बसलेली असायची. सगळे काम आटोपल्यावर तो परत स्थानकावर येऊन सतीशला औरंगाबादला सोडायचा. साधारण चार महिन्यांपूर्वी गवारे हा अशाच प्रकरणात जालना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे काही दिवस हा व्यवसाय थांबला होता. परंतु, मनीषाची सतीश सोबत ओळख झाली होती. तिने नंतर सतीशमार्फत गर्भलिंग निदान सुरू केले. त्याने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांचे लिंग निदान केल्याचे सांगितले आहे. परंतु, ही मशीन मनीषानेच आपल्याला दिल्याचा दावा तो करत आहे. तसेच अशाच आणखी दोन मशीन गवारेकडेही असल्याचे तो सांगतो.
'लोकमत'चा दट्टा; तपास अधिकाऱ्यांची धावपळ
गर्भपात प्रकरणातील प्रत्येक अपडेट आणि हालचाली 'लोकमत'ने मांडल्या आहेत. पोलिसांची तपासाची संथ गती आणि संशयास्पद भूमिकेवर मुद्देसूद बोट ठेवले. त्यामुळे तरी पोलीस यंत्रणा तपासात हालचाली करू लागली आहे. मंगळवारीही एक वृत्त प्रकाशित करताच तपास अधिकारी बाळासाहेब आघाव यांनी धावपळ सुरू केली. मंगळवारी दुपारी ते जिल्हा रुग्णालयात वकिलासोबत दिसले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन सोनोग्राफी मशीन तपासल्याचा अहवाल घेतला. या प्रकरणात 'लोकमत'चा दट्टा असल्याने तपास अधिकारी धावपळ करू लागले आहेत. असे असले तरी हाती काहीच लागलेले नाही.
पोलिसांची प्रतिमा होतेय मलिन?
सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती संथ ठेवली आहे. पोलिसांनी स्वत:हून आरोपी शोधणे तर दूरच; परंतु सध्या ताब्यात असलेल्या आरोपींनी नाव घेतलेल्या लोकांची उलट तपासणी करण्याचीही तसदी घेतली नाही. जालन्याच्या डॉ. गवारेचा यात समावेश असल्याचे वारंवार समोर येत आहे. जालन्यात त्याने असा गुन्हा केल्याचे उघडही झाले आहे. तो सध्या कारागृहात असून त्याला ताब्यात घेण्याबाबत अथवा चौकशीसाठी बोलावण्यासाठी पोलिसांनी काहीच केले नाही. तसेच सोनोग्राफी मशीनचा मालक कोण? ती आली कोठून? याचा शोधही पोलिसांना लागलेला नाही. पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास कधी लावणार? असा सवाल कायम आहे. या प्रकरणात पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. असे असले तरी पोलिसांनी अजूनही गांभीर्याने तपास केला नसल्याचे दिसते. तपास अधिकारी बाळासाहेब आघाव माध्यमांना बोलण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांना संपर्क करणे टाळले.
न्यायालयात केस दाखल करण्यासाठी सतीश सोनवणे याचा जबाब जेलमध्ये जाऊन घेतला आहे. यावेळी जेलरही सोबत होते. यात त्याने जालना येथील एका व्यक्तीचे नाव घेतले आहे. त्याच्या नावासह न्यायालयात केस देणार आहोत. पोलिसांनी काय तपास केला, कोणाचे नाव घेतले, याबाबत आम्ही बोलू शकत नाहीत.
- डॉ. महादेव चिंचोळे, प्राधिकृत अधिकारी, गर्भपात प्रकरण