Beed: ऐकावं ते नवलच; बीडमध्ये आयटी शिक्षकाने सोडविला गैरहजर ८५ विद्यार्थ्यांचा पेपर
By सोमनाथ खताळ | Published: February 18, 2024 08:54 AM2024-02-18T08:54:18+5:302024-02-18T08:54:44+5:30
Beed News: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेतलेल्या बीडमध्ये घेतलेल्या टंकलेखन (टायपींग) परिक्षेतील घोटाळ्याचा मास्टरमाईंड हा आयटी शिक्षक असल्याचे समोर आले आहे.
- सोमनाथ खताळ
बीड - महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेतलेल्या बीडमध्ये घेतलेल्या टंकलेखन (टायपींग) परिक्षेतील घोटाळ्याचा मास्टरमाईंड हा आयटी शिक्षक असल्याचे समोर आले आहे. प्रशिक्षित १७ लोकांच्या मदतीने या शिक्षकाने ८५ विद्यार्थ्यांचे पेपर सोडवून त्यांचा बनावट हजेरी पटही तयार केला. या सर्व प्रकारणाच्या चौकशीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी आयटी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
पी.एस.नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव आहे. २० डिसेंबर २०२३ रोजी बीडच्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयाची टायपींग परिक्षा घेण्यात आली होती. या ठिकाणी आदित्य कॉलेजच्या प्राचार्यांनी नागरगोजे यांची आयटी टीचर म्हणून नियूक्ती केली होती. दुपारच्या सत्रात एका विद्यार्थ्याने अवघ्या ३० मिनिटांत पाचही सेक्शन (थेरी, ई-मेल, लेटर, स्टेटमेंट, स्पीड पॅसेज) सोडविल्याचे दिसले. परिषेदच्या अध्यक्षांना याबाबत संशय आल्याने त्यांनी केंद्र संचालकांना खात्री करण्यास सांगितले. यावर परीक्षा केंद्रात २० विद्यार्थी हजर दिसले, तर ऑनलाइन हजेरीत ३३ विद्यार्थी होते. त्यानंतर तीन दिवसांचा अहवाल घेतला असता तब्बल ८५ विद्यार्थी केंद्रात गैरहजर असतानाही त्यांनी परिक्षा दिल्याचे दिसले. यावर अध्यक्षांनी बीडचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी चौकशी केल्यानंतर यात नागरगोजे यांचाच हात असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून नागरगोजे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून सायबर पोलिस तपास करत आहेत.
या संस्थाचीही होणार चौकशी
जे ८५ विद्यार्थी गैरहजर असतानाही हजर दाखविले त्या ज्ञानदीप कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, वडवणी (४३) प्रगती टायपिंग संस्था, माजलगाव (२४) आदित्य संगणक टायपिंग संस्था, माजलगाव (८) गणेश टाइपरायटिंग संस्था, वडवणी (७) इतर ३ या संस्थेचे चालकही अडचणीत आले आहेत. त्यांना देखील यात सहआरोपी करण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सायबर पोलिस तपास करत आहेत.
हजेरीपटही बनविले बनावट
परिक्षा परिषदेने टीचर आणि विद्यार्थी यांचे पासवर्ड नागरगोजे यांच्या वैयक्तीक मेल आयडीवर पाठविल होते. त्यामुळे गैरहजर ८५ विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी दिसल्याने त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांनीच इतर १७ किंवा त्यापेक्षा अधिक प्रशिक्षित लोकांकडून या विद्यार्थ्यांचा पेपर सोडविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आता १७ लोक आणि ८५ विद्यार्थी कोण आहेत? तसेच या शिक्षकासोबत आणखी कोणी आरोपी आहेत का? याचा शोध सायबर पोलिस घेणार आहेत. दरम्यान, गैरहजर ८५ विद्यार्थ्यांची बनावट हजेरीपटही चौकशी समितीला केंद्रावर आढळून आले आहे.