बीड लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बीडमध्ये मुंडे भगिनींची सरशी; भाजपच्या प्रीतम मुंडेंचा दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:38 IST2019-05-23T17:35:30+5:302019-05-23T17:38:33+5:30
नाही चालली जातीय समीकरणे; राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे पराभूत

बीड लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बीडमध्ये मुंडे भगिनींची सरशी; भाजपच्या प्रीतम मुंडेंचा दणदणीत विजय
- सतीश जोशी
बीड : बीड लोकसभा मतदार संघामध्ये भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा दणदणीत पराभव केला. मुंडे यांना विधानसभेच्या सहाही मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. या मतदारसंघामध्ये मतदारांनी जातीय राजकारणाला थारा दिला नसून, विकासाला आणि मोदींच्या ध्येयधोरणांना मत दिल्याचे चित्र पाहवयास मिळाले.
आष्टी विधानसभा मतदारसंघातील तीन फेऱ्यांची मतमोजणी बाकी होती. परळी, माजलगाव, केज, गेवराई आणि बीड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा प्रीतम मुंडे यांना १ लाख ७३ हजार मतांनी आघाडीवर होत्या. प्रीतम मुंडे यांना मतदारसंघात सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त मतदान झाले. परळी विधानसभा मतदारसंघात त्यांना १८ हजार ९१९ मतांची आघाडी मिळाली. माजलगावमध्ये १९ हजार ७१६, केजमध्ये २८ हजार, गेवराईत ३४ हजार ८८८, तर आष्टीमध्ये ६६ हजार ७८ मतांचे मताधिक्य मिळाले होते. आष्टी मतदारसंघातील तीन फेऱ्यांची मतमोजणी बाकी असली तरी मतदारांचा कल बघता ही आघाडी किमान १० हजाराने वाढेल असा अंदाज आहे.
या मतदारसंघात काही नेतेमंडळींनी जातीय समीकरणे मांडत मतदान फिरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मतदारांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत विकासाला मत, मोदींच्या ध्येयधोरणाला मत दिले. प्रीतम मुंडे यांना अपेक्षेप्रमाणे आष्टी मतदारसंघात थ्रीडी ने म्हणजे आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे व माजी आ. साहेबराव दरेकर यांनी एकत्रित येत ही आघाडी जास्तीत जास्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आतापर्यंत आष्टीने नेहमीच भाजपला भरभरुन मताधिक्य दिले. यावेळी मात्र मोठ्या मनाने मताधिक्य देऊन प्रीतम मुंडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
विकासाला दिले मत
बीड मतदारसंघात, राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणाला विकासात्मक दृष्टीला जनतेने डोक्यावर घेतले आहे. बीड जिल्ह्यात देखील त्यांच्यामुळेच आणि जिल्ह्यातील विकास कामांमुळे मतदारांनी भाजपला मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले. काही मंडळींनी जातीपातीचे राजकारण केले. परंतु मतदारांनी त्यास थारा दिला नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
संधीचे सोने करणार
मतदारांनी आम्ही केलेल्या विकास कामाला मत दिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणला. रेल्वेमार्ग वेशीपर्यंत आणला. उर्वरित कामेही युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येतील अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली.