जाणून घ्या बीड लोकसभेच्या तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या जमेच्या अन् उणे बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 03:38 PM2024-04-24T15:38:53+5:302024-04-24T15:41:15+5:30
मागील वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यंदा भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा सामना करणार
पंकजा मुंडे (भाजप):
- जमेच्या बाजू : ओबीसी नेत्या म्हणून ओळख. जिल्ह्यात एका विद्यमान खासदारांसह सहा आमदारांचे पाठबळ. जिल्ह्यात भाजपची ताकद. त्यातच राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) सोबत आल्याने आणखी बळ मिळाले आहे. वंजारी समाजाची ताकद त्यांच्या पाठीशी. सक्षम यंत्रणा.
- उणे बाजू : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या सक्रिय नव्हत्या. जिल्ह्यात संपर्क कमी. मोजक्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर येत नाहीत. पक्षांतर्गत नेत्यांचाही विरोध. कारखाना डबघाईला आल्याने अडचणीत.
- प्रचारातील प्रमुख मुद्दे : बेरोजगारी मिटविण्यासाठी प्रयत्न करू. नवीन प्रकल्प आणू. जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणण्यासह रस्त्यांचे जाळे तयार करू.
- प्रचाराचे सूत्रधार कोण? : पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- जमेच्या बाजू : येडेश्वरी कारखान्यामुळे शेतकरी सोबत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचाही अनुभव. मराठा कार्ड आणि शेतकरीपुत्र म्हणून मैदानात उतरल्याने सहानुभूती मिळू शकते.
- उणे बाजू : २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर ते गायब होते. जिल्ह्यात केवळ एक खासदार आणि एक आमदार सोबत. मॅनेजमेंटसाठी यंत्रणा अपुरी.
- प्रचारातील प्रमुख मुद्दे : रस्ते, उद्योग, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न
- प्रचाराचे सूत्रधार कोण? : आ. संदीप क्षीरसागर
अशोक हिंगे (वंचित बहुजन आघाडी)
- जमेच्या बाजू : मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात कायम साेबत. चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळख. कुणबी मराठा म्हणून उमेदवारी.
- उणे बाजू : आर्थिक बाजू कमी. प्रचारासाठीची यंत्रणा तोकडी. कार्यकर्त्यांचे फारसे जाळे नसणे. जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी नाही.
- प्रचारातील प्रमुख मुद्दे : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणार. वंचितांना मुख्य प्रवाहात आणने. धनशक्ती विरोधात जनशक्ती.
- प्रचाराचे सूत्रधार कोण? : अद्यापतरी सर्व मिळून प्रचार करत आहेत. मुख्य असे कोणीच नाही.