'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय
By शिरीष शिंदे | Updated: June 5, 2024 16:57 IST2024-06-05T16:56:05+5:302024-06-05T16:57:16+5:30
Beed Lok Sabha Result 2024: अशोक थोरातांच्या तुतारीने बजरंग सोनवणेंचे गणित बिघडवले; मतदान करताना चिन्हावरुन मतदारांचा संभ्रम झाल्याची चर्चा

'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय
Beed Lok Sabha Result 2024 : बीड : लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होताना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पडणाऱ्या मतदानाची चर्चा जिल्हाभरात होती तर दुसऱ्या बाजूला मतमोजणी केंद्रात असलेले मतमोजणी प्रतिनिधींचे लक्ष बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक भागोजी थोरात यांच्याकडे होते. थोरात यांना ३२ व्या फेरी अखेर ५४ हजार ८५० मतदान पडले. थोरात यांना तुतारी व सोनवणे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाच्या संभ्रमातून मतदान झाल्याची चर्चा मतदान केंद्रात दिवसभर होती.
२९ एप्रिलला लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या ४१ उमेदवारची नावे व चिन्ह निश्चित करण्यात आली होती. बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक भागोजी थोरात यांना ‘तुतारी’ चिन्ह दिले होते तर दुसऱ्या बाजूला नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्ह दिले गेले होते. दोन्ही चिन्हांमध्ये संभ्रम होऊ शकतो अशी शक्यता त्यावेळी वर्तविण्यात येत होती. विशेष म्हणजे उमेदवार निश्चित झाल्यानंतर पहिल्या क्रमांकावर महायुतीच्या पंकजा मुंडे यांचे कमळ चिन्ह, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचे ‘तुतारी वाजविणारा माणूस’, तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे सिद्धार्थ टाकरकर तर चौथ्या क्रमांकावर बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक भागोजी थोरात यांना ‘तुतारी’ हे चिन्ह हाेते. सोनवणे व थोरात यांच्यामध्ये केवळ एकाच बटणाचे अंतर होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार संभ्रमित झाले असावेत व ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हासमोर बटण दाबण्याऐवजी थोरात यांच्या तुतारीचे बटण दाबले असावेत, असा अंदाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
...अन्यथा लवकरच झाला असता निकाल जाहीर
मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून निकाल लागण्यास सुरुवात झाली. मतमोजणीदरम्यान काही फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर काही फेऱ्यामध्ये बजरंग सोनवणे आघाडीवर होते. शेवटच्या टप्प्यात तर आघाडी काही हजारांमध्ये होती. जर थोरात यांना पडलेले मतदान सोनवणे यांना पडले असते तर निकाल सायंकाळी सहा वाजताच जाहीर झाला असता, अशी चर्चा मतमोजणी कक्षात होती.
थोरात यांनी सुद्धा केला होता प्रचार
अशोक थोरात यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार केला होता. २५ एप्रिल ते ३ मे या कालावधीत थोरात यांनी प्रचारासाठी १८ हजार ५८५ रुपये एवढा खर्च केला असल्याचे निवडणूक विभागाला कळविलेले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रचारामुळे ही मते मिळाली असल्याचा दावा काहींनी केला परंतु ग्रामीण भागात थोरात यांना मते मिळाली आहेत, त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागात प्रचार केला होता का हा प्रश्न या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मतमोजणी हॉलमध्ये उपस्थित केला.