Beed Lok Sabha Result 2024: लोकसभा निकालामुळे बीडमध्ये तणावाची स्थिती; शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला केेली विशेष विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 20:48 IST2024-06-04T20:47:18+5:302024-06-04T20:48:59+5:30
निकाल जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील काही ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Beed Lok Sabha Result 2024: लोकसभा निकालामुळे बीडमध्ये तणावाची स्थिती; शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला केेली विशेष विनंती
Beed Lok Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्रात बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल श्वास रोखून धरणारा ठरला आहे. शेवटच्या फेरीतील मतमोजणी सुरू असून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना सुरू आहे. प्रशासनाने अद्याप अंतिम निकाल जाहीर केलेला नाही. मात्र निकाल जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील काही ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलीस प्रशासनाला महत्त्वपूर्ण विनंती केली आहे.
"बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे," असं शरद पवार यांनी बीड पोलिसांना उद्देशून लिहिलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, बीडमधील राजकीय लढाई ही अंतिम टप्प्यात पोहोचली असून कोणाचा विजय होणार, हे निश्चितपणे सांगणं कठीण आहे. कारण दोन्ही उमेदवारांमध्ये अवघ्या काही मतांचं अंतर आहे. तसंच पंकजा मुंडे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे. @DGPMaharashtra@CollectorBeed@ECISVEEP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 4, 2024
कशी झाली बीडची निवडणूक?
पंकजा मुंडे यांच्या जमेच्या बाजू : ओबीसी नेत्या म्हणून ओळख. जिल्ह्यात एका विद्यमान खासदारांसह सहा आमदारांचे पाठबळ. जिल्ह्यात भाजपची ताकद. त्यातच राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) सोबत आल्याने आणखी बळ मिळाले आहे. वंजारी समाजाची ताकद त्यांच्या पाठीशी. सक्षम यंत्रणा.
- उणे बाजू : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या सक्रिय नव्हत्या. जिल्ह्यात संपर्क कमी. मोजक्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर येत नाहीत. पक्षांतर्गत नेत्यांचाही विरोध. कारखाना डबघाईला आल्याने अडचणीत.
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- जमेच्या बाजू : येडेश्वरी कारखान्यामुळे शेतकरी सोबत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचाही अनुभव. मराठा कार्ड आणि शेतकरीपुत्र म्हणून मैदानात उतरल्याने सहानुभूती मिळू शकते.
- उणे बाजू : २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर ते गायब होते. जिल्ह्यात केवळ एक खासदार आणि एक आमदार सोबत. मॅनेजमेंटसाठी यंत्रणा अपुरी.