बीड लोकसभा: सोनवणेंच्या उमेदवारीने पंडितांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:32 AM2019-03-16T04:32:15+5:302019-03-16T04:32:43+5:30
प्रीतम मुंडे विरुद्ध सोनवणे लढत
- सतीश जोशी
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने बीड लोकसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गटाचा धक्का बसला आहे. सोनवणे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत.
बीडमधून भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. सोनवणे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. यापूर्वी सोनवणे यांनी जि.प.चे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद भूषिवले असून येडेश्वरी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. धनंजय मुंडे यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना हटवून सोनवणे यांना जिल्हाध्यक्ष केले आहे.
बीडच्या उमेदवारीसंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीस ज्येष्ठ नेते आ. जयदत्त क्षीरसागर हे अनुपस्थित होते. क्षीरसागर यांच्यासह धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांची संभाव्य उमेदवार म्हणून प्रमुख चर्चा होती. परंतु क्षीरसागरांनी लोकसभा लढविण्यास यापूर्वीच स्पष्ट नकार दिला होता. तर मुंडे हे पक्षाचे प्रमुख स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातच अडकून ठेवणे पक्षाला कदाचित उचित वाटले नसावे. त्यामुळे अमरसिंह पंडित यांचेच नाव उरले होते आणि त्यांनीही लढण्याची तयारी केली होती. मात्र, अचानक त्यांना डावलण्यात आले.