Indurikar Maharaj: “इंदोरीकर महाराज लस घेत नाही, तोवर कीर्तन होऊ देऊ नका”; शेतकरीपुत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:32 PM2021-11-09T19:32:58+5:302021-11-09T19:34:24+5:30
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही, असे विधान केले होते.
बीड: राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने १०० कोटींचा कोरोना प्रतिबंधक लसीचा टप्पाही पार केला आहे. देशातील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. यातच प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही, असे विधान केले होते. यानंतर आता जोपर्यंत इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची कीर्तने होऊ देऊ नये, अशी मागणी एका शेतकरीपुत्राने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.
कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचे वर्तन केले. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवले. त्यांना चांगल्या ताटात जेवणे दिले नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतके फटकून त्यांच्याशी वागले. इथे हात लावू नको, तिथे हात लावू नका, अशी सगळी परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर लस कशाला घ्यायची, असे इंदोरीकर महाराज यांनी म्हटले होते. यानंतर एका शेतकरीपुत्राने जिल्हाधिकाऱ्यांमार्फेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सदर मागणी केली आहे.
जनजागृती करणाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे
काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी मी लस घेणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे जनजागृती करणाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज जोपर्यंत लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नये, अशी मागणी शेतकरीपुत्राने केले आहे. दरम्यान, इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना शास्त्रीय दृष्टीकोनातून, अध्यात्मिक दृष्टीकोनातून महाराजांकडे ज्ञान आहे. मी स्वत: वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन. कीर्तनकार देशमुख ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाइलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या कीर्तनाला मोठी गर्दी करतात. त्यांनी लसीसंबंधी असे वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्कीच भेटून बोलेन, असे टोपे यांनी म्हटले होते.