बीडमध्ये दारू लपविल्यामुळे पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:30 AM2018-05-11T00:30:32+5:302018-05-11T00:30:32+5:30
दारू लपवून ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरेश अर्जुन निकम याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची घटना चार वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे घडली होती. याप्रकरणी बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी आरोपी सुरेश निकम यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दारू लपवून ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरेश अर्जुन निकम याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची घटना चार वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे घडली होती. याप्रकरणी बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी आरोपी सुरेश निकम यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
३१ आॅक्टोबर २०१४ रोजी मराठवाडी येथे आरोपी व त्याची लीलाबाई हे वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. यावेळी सुरेश व त्याची पत्नी लीलाबाई यांच्यात दारू कुठे लपवून ठेवली या कारणावरून भांडण झाले होते. वाद वाढत जाऊन चिडलेल्या सुरेशने पत्नी लीलाबाई हिचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. वीटभट्टी मालक बाबासाहेब जाधव (रा. मराठवाडी ता.आष्टी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश निकम याच्याविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. आष्टी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा.पोलीस निरीक्षक एस.डी.गुरमे यांनी या गुन्ह्याचा तपास करून या प्रकरणात आरोपीविरूद्ध दोषारोपत्र दाखल केले होते व सदरचे प्रकरण हे मा.जिल्हा सत्र न्यायाधीश बीड यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले होते.
प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्या. ए.एस.गांधी यांच्या न्यायालयासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. मयताची सहा वर्षाची मुलगी ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिचीच साक्ष महत्वाची ठरली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर परिस्थितीजन्य पुराव्याचे अवलोकन करून आणि जिल्हा सरकारी वकील अजय राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. ए.एस.गांधी यांनी आरोपी सुरेश अर्जुन निकम दोषी ठरवत जन्मठेप आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी ए.एस.आय. ठाकूर व हे.कॉ. डोंगरे यांनी मदत केली.