Beed News: रिस्क नको म्हणून पोलिसांनी अटक टाळली, विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाचे रुग्णालयातून ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 04:11 PM2022-04-10T16:11:22+5:302022-04-10T16:11:27+5:30
चौथीत शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने संतप्त पालकांनी शिक्षकास चांगलाच चोप दिला होता. जखमी शिक्षकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्याने 10 एप्रिल रोजी सकाळी रुग्णालयातून पोबारा केला.
बीड: शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने संतप्त पालकांनी शिक्षकास चांगलाच चोप दिला होता. जखमी शिक्षकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यास बेदम मारहाण केल्याने स्वत:च्या पायावर चालणेही मुश्कील झाले होते. त्यामुळेच रिस्क नको म्हणून पोलिसांनी अटक केली नाही. मात्र, शिक्षकाने 10 एप्रिल रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे. हा मोठा निष्काळजीपणा शिवाजीनगर पोलिसांच्या अंगलट आला आहे.
शाहेदखान कासम पठाण (33, रा. नायगाव, ता. पाटोदा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित 10 वर्षीय मुलगी गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेते. 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी मधल्या सुटीनंतर शाहेदखान पठाण हा अध्यापनासाठी वर्गात आला. यावेळी त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्यानंतर शिक्षक शाहेदखान कोणाला काहीही सांगू नकाे, असे बजावले. 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पीडितेच्या संतप्त नातेवाइकांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर शिक्षक शाहेद खान यास त्यांनी लाथाबुक्क्यांनी चोप दिला.
'लोकमत'ने उपस्थित केली होती शंका
जखमी शाहेदखान यास जिल्हा रुग्णालयात वॉर्ड क्र.6 मध्ये उपचारार्थ दाखल केले होते. 10 रोजी सकाळी आठ वाजता उपचाराची कागदपत्रे खाटावर ठेऊन त्याने धूम ठोकली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पो.नि. केतन राठोड यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. दरम्यान, शाहेदखान पठाण याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती, त्यामुळे धोका नको म्हणून त्यास पोलिसांनी अटक केली नही. मात्र, त्यास नजरकैदेत ठेवता आले असते. त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी काहीच उपाय केले नाहीत, अशी शंका 'लोकमत'ने 10 रोजीच्या अंकातील वृत्तात उपस्थित केली होती, ती खरी ठरली.
पोलीस एवढे गाफील कसे....
आरोपीस उपचारादरम्यान अटक न करताही नजरकैदेत ठेवता आले असते. मात्र, अटकेऐवजी पोलिसांनी पलायनाची रिस्क घेतली. शाळेला भेट दिली, गुन्हा नोंद झाला म्हणजे ठाणेप्रमुखांची जबाबदारी संपते का, पोलीस एवढे गाफील कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, आरोपी मारहाणीत जखमी होता, त्यामुळे त्यास अटक केली नव्हती. त्याचा कुठल्याही स्थितीत शोध घेऊन अटक करण्यात येईल, अशी माहिती उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.