बीडमध्ये पैशासाठी एकुलत्या एक मुलाने जन्मदातीला दाखविले मयत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:51 AM2018-01-10T00:51:09+5:302018-01-10T00:51:15+5:30

शासनाकडून मिळणा-या मावेजासाठी चक्क जन्मदात्या आईलाच मयत दाखवून मावेजा लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटे कागदपत्रे देणा-या ग्रामसेवक, तलाठी व पोटच्या मुलाविरोधात ६५ वर्षीय आजीबाईने बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

In Beed, the only child for money is shown in birthdate! | बीडमध्ये पैशासाठी एकुलत्या एक मुलाने जन्मदातीला दाखविले मयत!

बीडमध्ये पैशासाठी एकुलत्या एक मुलाने जन्मदातीला दाखविले मयत!

googlenewsNext
ठळक मुद्देआईची मुलाविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार

सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पैशापुढे रक्ताच्या नात्याचाही विसर पडतो, याचा प्रत्यय बीड तालुक्यातील पाली येथे समोर आला आहे. शासनाकडून मिळणा-या मावेजासाठी चक्क जन्मदात्या आईलाच मयत दाखवून मावेजा लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटे कागदपत्रे देणा-या ग्रामसेवक, तलाठी व पोटच्या मुलाविरोधात ६५ वर्षीय आजीबाईने बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रूक्मिणबाई अश्रुबा धनवडे (रा.धनवडे वस्ती, पाली, ता.बीड) असे या जिवंत आईचे नाव असून सर्जेराव धनवडे असे मुलाचे नाव आहे. रूक्मिणबाई यांचे पती आश्रुबा धनवडे यांचे ७ जून २०१५ रोजी निधन झाले. त्यांना सर्जेराव हा एकुलता एक मुलगा असून लक्ष्मीबाई ही विवाहित एकच मुलगी आहे. पाली येथे रूक्मिणबाई यांना ५ एकर २४ गुंठे एवढी जमीन आहे.

यातील काही जमीन सोलापूर-धुळे या क्र. २११ महामार्गासाठी भारत सरकारने संपादित केली. याचा मावेजा रूक्मिणबाई यांना तब्बल १ कोटी २० लाख रूपये एवढा मिळणार होता. परंतु आपली आई हे पैसे आपल्याला देणार नाही. त्यासाठी मुलगा सर्जेराव यानेच ग्रामसेवक एस.एस.वीर यांना हाताशी धरून ५ जानेवारी २०१६ रोजी रूक्मिनबाई यांचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र काढून घेतले. यासाठी तलाठ्यांनाही हाताशी धरले. या सर्वांच्या ‘अर्थ’पूर्ण सहकार्यानेच सर्जेरावने शासनाकडून १ कोटी २० लाख पैकी ५० लाख रूपये उचलले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, हा सर्व प्रकार समजल्यानंतर रूक्मिणबाई धनवडे यांना धक्काच बसला. त्यांच्या नातेवाईकांनाही ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर सर्वच अवाक झाले. रूक्मिणबाई यांनी तात्काळ मुलगी लक्ष्मीबाई यांना संपर्क केला आणि घडला प्रकार सांगितला. दोघींनीही ७ जानेवारी रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून एकुलता एक मुलगा सर्जेराव, तलाठी व ग्रामसेवक यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणात काही दाखल झाले नसले तरी चौकशीनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येणार असल्याचे दिसते. यामध्ये कोण कोण सहभागी आहे, याचाही उलगडा होणार असल्याने अनेकांच्या पायाखालीच वाळू सरकली आहे. याप्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रूक्मिणबाई धनवडे यांनी केली आहे.

ग्रामसेवक म्हणतात.. चौकशीत बघून घेऊ !
याबाबत मृत्यू प्रमाणपत्र देणारे ग्रामसवेक एस.एस.वीर यांना संपर्क केला. ते म्हणाले, हे प्रमाणपत्र देताना मी खात्री केली नाही. आमच्या लिपिकाने दिले असेल, असे सांगून हात झटकले. परंतु जबाबदारीचे भान देताच त्यांचे हे ‘स्टेटमेंट’ बदलले आणि सर्जेराव यांनी आपल्याला तसे लेखी दिले होते, असा खुलासा केला. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना वीर हे आपले वाक्य बदलत होते. त्यांच्या बोलण्यातून या प्रकरणात ते चांगलेच भयभीत झाले असून त्यांच्या मनात कारवाईची भिती असल्याचे स्पष्ट जाणवत होते. माझ्याकडे पूर्वी पालीचा कारभार होता, आता मी पंचायत समितीत आहे, असेही त्यांनी सांगितले. चौकशीत काय होईल, ते बघून घेऊ, असे म्हणत बोलण्यास टाळले.

नात्यावर अविश्वास
ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस पोटात वागविले. स्वत: उपाशी राहून मुलाचे पोट भरले, अशा जन्मदातीलाच केवळ पैशासाठी जीवंतपणी मयत दाखवून नात्याला काळीमा फासणारा प्रकार सर्जेराव यांनी केल्याने संताप व्यक्त होत आहे.
४या प्रकरणात सर्जेराव यांना मदत करणाºया प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रूक्मिनबाई यांच्यासह त्यांची मुलगी लक्ष्मीबाई यांनी केली आहे.

माझा मुलगा असे करीत असे आयुष्यात कधी वाटले नव्हते. तो माझ्या नजरेसमोर गुन्हेगार आहे. मला मयत दाखविण्यासाठी प्रमाणपत्र देणाºया प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांसह सर्जेराववर कठोर कारवाई करावी, याबाबत आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
- रूक्मिणबाई धनवडे, पाली, ता.बीड

ग्रामसेवकाचे
‘अर्थ’पूर्ण सहकार्य
रूक्मीणबाई या जिवंत असतानाही ग्रामसेवक एस.एस.वीर यांनी त्यांना मयत दाखवून सर्जेराव यांना मृत्यू प्रमाणपत्र दिले.
हे प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यांनी कसलीच खात्री न करता सर्जेराव यांना ‘अर्थ’पूर्ण सहकार्य केले. त्यामुळेच त्यांना मावेजाची रक्कम हडप करण्यास मदत केली.
या प्रकरणात अगोदर ग्रामसेवकावरच कारवाई करावी, अशी मागणी रूक्मिणबाई यांनी केली आहे.

Web Title: In Beed, the only child for money is shown in birthdate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.