बीड, परळी देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:28 AM2018-10-01T00:28:18+5:302018-10-01T00:28:56+5:30
पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल असे मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल असे मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रथमच संगणकीकृत विसाव्या पशूगणनेचा प्रारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, सह आयुक्त डॉ. सुनील राऊतमारे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पशु संवर्धन अधिकारी संतोष पालवे उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यस्तरीय संगणकीकृत पशुगणनेचा शुभारंभ परळीतून होत आहे. यामुळे आपल्याकडील पशुधन, त्यांना असणारे आजार आपल्याला माहित होतील व त्यावर उपाय शोधणे सोपे होईल. एखादी योजना करता येणार आहे. यासाठी आपल्या कडील पशुधनाची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात पशुसंवर्धन आणि ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून चांगली संयुक्त योजना राबविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
महादेव जानकर म्हणाले, पशुपालकांनी गणना करून घेणे आवश्यक आहे. येत्या काळात मुख्यमंत्री पशुपालक योजना कार्यान्वित होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय संगणकीकृत पशुगणनेचा कार्यक्रम आम्ही परळीत घ्यायचा ठरवला आहे. परळी हे राज्यात अनेक गोष्टींचे केंद्र झाले आहे, तसे भविष्यातील देशाच्या खूप मोठ्या लोकनेत्यांचेही ते केंद्र असणार आहे, असेही जानकर यांनी सांगितले.
प्रारंभी गोमातेची पूजा करण्यात आली. धारूर येथील राज्यातील पहिल्या शेळी पालक उत्पादक कंपनीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. प्रास्तविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले.