राजकारणाचा ""बीड पॅटर्न""
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:24+5:302021-09-15T04:39:24+5:30
अंगात पांढरा कुर्ता, खादीची पँट, डोक्यावर कडक टोपी अन् पायात कोल्हापुरी चप्पल घालून मूषक स्वत:ला आरशात न्याहाळत होता. मोबाईलवर ...
अंगात पांढरा कुर्ता, खादीची पँट, डोक्यावर कडक टोपी अन् पायात कोल्हापुरी चप्पल घालून मूषक स्वत:ला आरशात न्याहाळत होता. मोबाईलवर सेल्फी काढून फेसबुकवरही फाेटो शेअर केला. इकडे बाप्पाही ऑनलाईन होतेच. फोटो पाहून ते तर अवाक्च झाले. त्यांनी फोटोखाली ''''लय भारी'''' अशी पोस्ट टाकली. बाप्पांची पोस्ट पाहून मूषकाची कळी खुलली... थँक्यू... थँक्यू... महाराज, म्हणत त्याने त्यांच्या पोस्टला बदाम ठोकला. बाप्पांनी घाईघाईतच उरकले अन् रथात येऊन बसले. इकडे मूषक लाईक अन् कमेंट पाहण्यातच व्यस्त होता. बाप्पांनी, ''''नेते चला...'''' असा आवाज दिल्यावर तो भानावर आला अन् टुणकन उडी मारून बाप्पांसमोर नतमस्तक झाला. महाराज, काळजी करू नका... मी काही इलेक्शन लढविणार नाही... इथे बीडमध्ये फुटा-फुटावर राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष अन् नेते आहेत. त्यात माझी भर कशाला? बाप्पांनी मान हलवली अन् म्हणाले, मग आज हा पुढाऱ्याचा वेश कसा? ''''कारण राजकारण...'''' असे म्हणत मूषक खुदकन् हसला. बाप्पांनी स्मितहास्य करून त्यास दाद दिली. महाराज, राज्यात ईडी अन् सीडी, बीडमध्ये थेट बेडी आहे. बाप्पा कान व डोळे एकाग्र करून मूषकाकडे पाहत होते. तो चांगलाच खुलला होता. म्हणाला, महाराज, ही पाहा बीड नगरपालिका... घराची कळा अंगण सांगते, तसे समोरच्या रस्त्यावरील खड्ड्यांवरून अंदाज आलाच असेल तुम्हाला. कळले - कळले म्हणत बाप्पा रेलून बसले. मूषक धापा देत पावले टाकत होता. एका हाताने घाम पुसत म्हणाला, महाराज, शहर दिसायला छान... कागदावर भारी प्लॅन, पण सगळीकडे धूळ अन् घाण..! काका- पुतण्यात फाईट अन् वातावरण टाईट, असं सगळं सुरू आहे. बाकीच्या गोटात काय हालहवाल? या प्रश्नावर मूषक हसला अन् म्हणाला, इथं ''''घडी''''चा भरोसा नाही. ''''फुल्ल'''' टेंशन यायचं काम आहे. कोण कोणाचा ''''हात'''' सोडेल अन् कोण कोणावर ''''धनुष्या''''चा दोर ताणून ''''संग्राम'''' करील काही नेम नाही. कालचे शत्रू रातोरात मित्र अन् कालपर्यंतचे दोस्त कधीही दुश्मन बनू शकतात. शेवटी सगळी मोहमाया..! बाप्पांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. तेवढ्यात मूषक म्हणतो, महाराज, आला आपला दरबार... पोटभर खा अन् आराम करा... ये जो पब्लिक है, सब जानती है !
....