दीड कोटीच्या सिगारेट लंपास करणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 05:37 PM2019-06-04T17:37:02+5:302019-06-04T17:43:06+5:30
पाच आरोपींना ताब्यात घेतले असून आणखी आरोपींचा शोध सुरूच आहे
बीड : गेवराई तालुक्यातील पांडळसिंगी-मादळमोही दरम्यानच्या रस्त्यावर चालकाला मारहाण करून सिगारेटने भरलेला टेम्पो लुटणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. पाच आरोपींना ताब्यात घेतले असून आणखी आरोपींचा शोध सुरूच आहे. तसेच मुद्देमाल हस्तगत करण्याचा तपास बीडपोलिसांकडून केला जात आहे.
सादीक गुलाब पठाण, शोएम महमंद शेख, जितेंद्र सुभार्ष सुर्यवंशी (रा.जातेगाव), विशाल वैभव गायकवाड (रा. कोंडापुरी ता.शिरूर जि.पुणे), रवि लक्ष्मण मुंडे (हिवरे रोड, शिकरापूर जि.पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. १७ मे २०१९ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पुण्याहून बीडकडे विविध कंपनीच्या सिगारेट, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, चिप्स, आटा असे साहित्य घेऊन टेम्पो येत होता. गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी ते मादळमोही या दरम्यानच्या रस्त्यावर दुचाकी व जीपमधून आलेल्या आरोपींनी टेम्पो अडविला. चालकाला आपल्या जीपमध्ये घेत मारहाण केली. तसेच टेम्पो सुद्धा घेऊन ते पसार झाले.
टेम्पो चालक दत्ता हरीभाऊ दिवटे (२८ रा.बाबुर्डी ता.पारनेर जि. अहमदनगर) यांना करंजी (ता.पाथर्डी जि.अहमदनगर) परिसरात मारहाण करून सोडून दिले. त्यानंतर दिवटे यांनी गेवराई पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात १ कोटी ३९ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तात्काळ तपासकामी पथके रवाना केली होती. दरम्यान, हा टेम्पो लुटणारे आरोपी पुणे जिल्ह्यातील शिकरापूर परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिकरापूरला रवाना झाले. येथे विविध भागात सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पुढील तपासकामी गेवराई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मुद्देमालाचा तपास बीड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जून भोसले, स्थागुशा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, गेवराईचे पोनि बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सपोनि अमोल धस, पोह सलीम शेख, पोना नरेंद्र बांगर, प्रसाद कदम, रामदास तांदळे, विकी सुरवसे, आसेफ शेख, पोशि आलीम शेख, चालक सफौ संजय जायभाये, पोना मुकुंद सुस्कर आदींनी केली.