बीड पोलिसांचे श्वान, काम करतात वेगवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:34 AM2019-04-21T00:34:15+5:302019-04-21T00:34:59+5:30
जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. विशेष म्हणजे गुन्हे शोधण्यात बीडच्या श्वानांनी अव्वल स्थानही पटकावलेले आहे. यामुळे बीड पोलिसांची मानही उंचावली आहे. अगदी स्त्रीभ्रूण हत्येपासून ते खुनाच्या अरोपी, काळेगावचे रेडिओ स्फोटापर्यंतच्या गुन्ह्यात श्वानांची भूमिका अग्रस्थानी राहिलेली आहे. श्वानांचे काम सध्या वेगवान सुरू असल्याने समाधान आहे.
बीड जिल्हा पोलीस दलात डॉन, रॉकी, मार्शल, चॅम्प, जॉनी, बोल्ट अशी सहा श्वान कार्यरत आहेत. यातील रॉकी, डॉन आणि जॉनी हे तीनही श्वान अनुभवी आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला होता. यामध्ये घटनास्थळी कसलाही पुरावा नव्हता. मात्र रॉकी या अनुभवी श्वानाने अधिकाऱ्यांना आरोपीच्या घरापर्यंत पोहचविले होते. त्यामुळे उस्मानाबाद पोलिसांना या खूनाचा तपास करण्यात यश आले होते. तसेच ज्या प्रकरणामुळे बीड जिल्हा बदनाम झाला त्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात अर्भक टाकलेल्या ठिकाणी श्वानानींच पोहोचविले होते. या प्रकरणात श्वानांची भूमिका खुप महत्वपूर्ण राहिली होती. चोरी, दरोडा, खून यासह व्हीआयपी बंदोबस्त, सार्वजनिक ठिकाणे, मर्मस्थळांची तपासणीही या श्वानांमार्फत केली जाते. त्यामुळे आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकही गैरप्रकार घडला नाही. हे टाळण्यात श्वानांची भूमिका महत्वाची राहिली.
असे असते श्वानांचे दिवसभराचे नियोजन
सकाळी सहा वाजताच सर्वांना उठविले जाते. त्यांना शहराबाहेर नेऊन त्यांच्याकडून सराव करून घेतला जातो. सराव झाल्यानंतर त्यांना जेवण दिले जाते. त्यानंतर आराम असतो. एखादी घटना घडली तरच त्यांना बाहेर काढले जाते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा एक तास सराव करून घेतला जातो. त्यानंतर जेवण आणि नंतर आराम, असे त्यांचे नियोजन आहे. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पंखा, स्वच्छता, बाथरूम, पाणी इ. व्यवस्था करण्यात आलेली आहे.
चॅम्प या श्वानाने गतवर्षी मध्यप्रदेश राज्यातील टेकनपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभाग नोंदवला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राला ‘ए’ ग्रेड मिळवून दिला होता. या पदकासह सर्वच श्वानांची कामगिरी उत्कृष्ट राहिल्याने जिल्हा पोलीस दलामध्ये पदकांची मोठी कमाई झाली आहे.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बो-हाडे, विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान हँडलर योग्य कर्तव्य बजावत आहेत.