बीड पोलिसांनी तुळजापूरमधून पळालेले जोडपे सोलापुरात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:37 PM2018-12-07T15:37:24+5:302018-12-07T15:39:10+5:30
बीड पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आणि या जोडप्याचा सोलापूर जिल्ह्यात शोध घेतला.
बीड : शिक्षणासाठी गाव सोडून तुळजापूरला आलेल्या तरुणाने नववीच्या वर्गातील मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. नंतर लग्न केले. वर्षभर राज्यभर फिरले. गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे आला. त्यांनी अवघ्या महिनाभरात तपास करुन बुधवारी या जोडप्याला सोलापूर जिल्ह्यात पकडले.
नंदकुमार दत्तात्रय साठे (२४, रा. देवीदारफळ, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. नंदकुमारची गावातीलच अपेक्षा (नाव बदलले आहे) नावाच्या मुलीसोबत ओळख झाली. अपेक्षाची आई कामासाठी तुळजापूरला आली. त्यांच्या पाठोपाठ नंदकुमारही शिक्षणासाठी तुळजापूरला आला. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अपेक्षासोबत त्याची चांगलीच गट्टी जमली. यातून प्रेम झाले अन् त्याने १६ आॅक्टोबर २०१७ रोजी अपेक्षाला पळवून नेले. अपेक्षाच्या आईने तुळजापूर पोलीस ठाण्यात नंदकुमारविरोधात गुन्हा दाखल केला.
तुळजापूर पोलिसांना त्यांचा शोध लागला नाही. म्हणून हा तपास बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे महिनाभरापूर्वी वर्ग करण्यात आला. पो. उप नि. भारत माने यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आणि या जोडप्याला सोलापूर जिल्ह्यात शोध घेतला. त्यांना तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. भारत माने, पो. ह. प्रताप वाळके, सुरेखा उगले, मीना घोडके, विकास नेवडे यांनी केली.