बीड पोलिसांकडून चोरी, घरफोडीतील ९ लाखांचा मुद्देमाल फिर्यांदीना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 07:10 PM2019-03-07T19:10:10+5:302019-03-07T19:21:35+5:30
किंमती मुद्देमाल संबंधित फिर्यांदींना बीड पोलिसांकडून सन्मानपूर्वक परत करण्यात आला.
बीड : जिल्ह्यातील चोरी, घरफोडीसारख्या विविध १७ गुन्ह्यांतील चोरट्यांकडून हस्तगत केलेला तब्बल ८ लाख ९९ हजार १३० रूपयांचा किंमती मुद्देमाल संबंधित फिर्यांदींना बीडपोलिसांकडून सन्मानपूर्वक परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला.
मागील दीड वर्षांपासून बीड पोलिसांकडून चोरी, दरोडा, घरफोड्यांचा तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. तसेच त्यांच्याकडून मिळालेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला जातो. आतापर्यंत १३ सार्वजनिक कार्यक्रम घेऊन त्यामध्ये २२१ गुन्ह्यातील २२४ फिर्यादींना ९१ लाख ९६ हजार ९२४ रूपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे. बुधवारीही असाच कार्यक्रम घेण्यात आला. १७ गुन्ह्यांतील ९ लाख रूपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधीक्षक सुधीर खिरडक, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या उपस्थितीत पार पडला. सुत्रसंचालन जयश्री नरवडे यांनी केले. जमादार राम यादव, संगीता सिरसाट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी फिर्यादींसह विविघ क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.