बीड पोलिसांकडून ११ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 05:29 PM2018-12-03T17:29:17+5:302018-12-03T17:30:03+5:30
२७ तोळे सोने, १२ किलो चांदी, तीन दुचाकीसह मोबाईलचा समावेश
बीड : चोरी, घरफोडी आदी १४ गुन्ह्यातील ११ लाख १४ हजार ६७५ रुपयांचा किंमती मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्ह्यांचा तपास करण्यात आलेला आहे. यामध्ये सोने, चांदीसह दुचाकी, मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आले. १४ गुन्ह्यांमधून २७६.८ ग्रॅम सोने, १२ किलो ८०० ग्रॅम चांदी, तीन दुचाकी व एक मोबाईल असा ११ लाख १४ हजार रुपयांचा किंमती मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, भास्कर सावंत, पो. नि. घनशाम पाळवदे, स. पो. नि. दिलीप तेजनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पो. ह. राम यादव, संगीता सिरसट यांनी परिश्रम घेतले. ठाण्यांचे मोहरीर, प्रभारी अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
चालू वर्षात ११ सार्वजनिक कार्यक्रम घेतले. यामध्ये ७१ लाख ३८ हजार ९३८ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत केला आहे. यापुढेही असे कार्यक्रम अखंडितपणे सुरु ठेवले जातील.
- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड