बीडमध्ये गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस; ४० कोटींच्या व्यवहाराचे कुपन पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 09:41 PM2020-04-09T21:41:23+5:302020-04-09T21:43:27+5:30
पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल
बीड : शहरातील पेठ बीड भागात गांधीनगर येथील एका भंगारच्या दुकानातून मोठ्याप्रमाणत गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याठइकाणी बुधवारी रात्री ८ वाजता पोलिसांनी छापा टाकला. मात्र, गुटखा न मिळता त्याठिकाणी खरेदी-विक्री करण्यासाठी असलेले ४० कोटी रुपयांचे कुपन पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा तस्कर करणारे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. कुपनच्या किंमतीवरून अंदाजे ४० कोटी रुपयांचा गुटखा जिल्ह्यात विक्री केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही कारवाई गुरुवारी देखील सुरुच होती. यादरम्यान, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्करराव सावंत, पोनि विश्वास पाटील हे पेठ बीड ठाण्यात तळ ठोकून होते.
गांधीनगरमधील महेबूब खान याचे भंगार व टायरचे दुकान आहे. याठिकाणावरून जिल्हाभरात तसेच इतर जिल्ह्यात गुटखा तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून बुधवारी रात्री पोनि विश्वास पाटील व सहक-यांनी छापा मारला. यावेळी तेथे लाखो रुपयांच्या कुपनचे गठ्ठे आढळले. ते ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले यावेळी कारवाई करत असताना कुपन मिळाले परंतु गुटखा मिळाला नाही. यावेळी कुपनची चौकशी केली असता ३ पुडे गुटखा दिला की एक कुपन दिले जात होते. अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून निरीक्षक विश्वास पाटील यांच्या फिर्यादीवरून विषद्रव्याची विक्री व त्यास प्रोत्साहन देण्याचे कृत्य केल्याचा गुन्हा नोंदविण्याचे सुरु होते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कुपनची मोजदाद करताना पोलीस कर्मचारी घामाघूम झाले होते. एकूण ४० कोटी रुपये किंमतीचे हे कुपन पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासात अधिक माहिती अधिक माहिती समोर येणार आहे.