रॅगिंगमुळे आत्महत्या प्रकरणाचा तपास बीड पोलीसच करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:00 PM2020-02-12T12:00:19+5:302020-02-12T12:02:16+5:30
महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गणेशच्या नातेवाईकांनी केला.
- प्रभात बुडूख
बीड : बीड जिल्ह्यातील गणेश कैलास म्हेत्रे (२०, रा. नाळवंडी, ता. बीड) या मेडिकलच्या विद्यार्थ्यांने रॅगिंगमुळे आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास उदगीर (ता. लातूर) येथे वर्ग करण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, सदर तपास पिंपळनेर पोलिसांनीच करावा, असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी दिले; परंतु महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गणेशच्या नातेवाईकांनी केला.
गणेश म्हेत्रे हा विद्यार्थी उदगीर (जि. लातूर) येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान रॅगिंगला कंटाळून त्याने ७ फेब्रुवारी रोजी नाळवंडी येथे शेतात जाऊन विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्याचा ८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही आत्महत्या रॅगिंगला कंटाळून झाली असा नातेवाईकांचा आरोप होता. त्यासंदर्भातील काही आॅडिओ क्लिप व व्हीडीओ देखील त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान पिंपळनेर पोलिसांकडून हात झटकत हे प्रकरण उदगीर पोलिसांकडे वर्ग करण्याची कार्यवाही सुरु होती. मात्र, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याप्रकरणातील संपूर्ण कागदपत्रे तपासली व त्यानंतर हा गुन्हा उदगीर येथे वर्ग न करण्याचे त्यांनी ठरविले. दरम्यान या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीसच करतील, असे निर्देशदेखील पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यावेळी दिले आहेत.
ऑडिओनंतर व्हिडिओदेखील झाला प्रसारित
उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात होत असलेल्या रॅगिंग संदर्भात तसेच गणेश म्हेत्रे याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात आली होती. दरम्यान, असाच प्रकार महाविद्यालयाच्या एका खोलीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना गाण्यावर डान्स करायला लावतानाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. त्यामुळे संबंधित रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक करून कारवाई करावी, अशी मागणी नाळवंडी ग्रामस्थांकडून होत आहे.
बीड जिल्ह्यातील महाविद्यालयांना पत्र
च् या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड आणि अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून, त्यात आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना त्यांच्या महाविद्यालयात रॅगिंगसारखे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्याचे दिण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महाविद्यालयात असे प्रकार होत असतील, तर शिक्षक व विद्यार्थ्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोद्दार यांनी केले आहे.