बीड ‘रापम’ कार्यालयात भर दुपारी ‘फ्री स्टाईल’ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:50 PM2019-12-12T23:50:12+5:302019-12-12T23:51:11+5:30
कार्यालयीन कामाच्या वादातून हेल्पर व लिपीकामध्ये चांगलीच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. ही घटना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गुरूवारी दुपारी घडली.
बीड : कार्यालयीन कामाच्या वादातून हेल्पर व लिपीकामध्ये चांगलीच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. ही घटना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गुरूवारी दुपारी घडली. रात्री उशिरापर्यंत याबाबत ठाण्यात नोंद झाली नव्हती.
विभागीय कार्यालयात विविध कामांसाठी जिल्ह्यातील कर्मचारी येत असतात. गुरूवारी दुपारीही माजलगाव आगारात कार्यरत असलेले तंत्रज्ञ बीडला आले. संबंधित लिपीकाला कार्यालयीन कामकाजाबाबत विचारणा केली. बोलता बोलता त्यांच्यात वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत दोघांचे भांडण सोडविले. मात्र, या भांडणाने कार्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, विभागीय कार्यालयात सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. सुरक्षा रक्षक मुख्य प्रवेशद्वाराला असतात तर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविलेले नाहीत. त्यामुळे एसटीमधील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
हाणामारी करणारे दोघेही नातेवाईक
कार्यालयात हाणामारी खेळणारे दोन्ही कर्मचारी नातेवाईक असल्याचेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. दोघांच्या वादाबद्दल समजताच संघटना व इतर कर्मचाºयांनी मध्यस्थी करून तात्पुरते प्रकरण मिटविले. याबाबत दोघेही उशिरापर्यंत ठाण्यात गेले नव्हते.
कार्यालय कारवाई करणार का ?
कार्यालयात भांडण झाल्याने रामपची प्रतिमा मलीन झाली आहे. दोघांचे वाद मिटले असले तरी कार्यालयात वाद होणे हे चुक आहे. आता यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.