बीडचा निकाल ४ वाजेपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:58 PM2019-10-23T23:58:49+5:302019-10-23T23:59:12+5:30
चर्चेत असलेल्या बीड विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार असून २७ फेऱ्या होतील. ३४ उमेदवार असल्याने दुपारी चार वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती लागण्याची शक्यता आहे.
बीड : चर्चेत असलेल्या बीड विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार असून २७ फेऱ्या होतील. ३४ उमेदवार असल्याने दुपारी चार वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून मतमोजणीच्या ठिकाणी भ्रमणध्वनी नेण्यास प्रतिबंध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले.
२१ आॅक्टोबर रोजी मतदार संघातील ३७४ मतदान केंद्रांवर १ लाख २० हजार ५९० पुरुष आणि ९८ हजार ९०९ महिला व एक तृतीयपंथी अशा २ लाख १९ हजार ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६५.४९ टक्के मतदान झाले. गुरुवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतांच्या गणनेसाठी २ टेबल असून प्रारंभी या व नंतर इव्हीएममधील मतांची मोजणी होईल. या कामासाठी १४ पर्यवेक्षक, १४ सहाय्यक, १४ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत. मतमोजणीची सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या सुविधा अॅपमध्ये नोंदविण्यासाठी स्वतंत्र कक्ष असेल. दरम्यान बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत १८१२ पोस्टल मते प्राप्त झाली होती. यात ११५ सैनिकांची मते असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.