बीडमध्ये सोशल मीडियातून '१५ दिवस जिल्हा बंद' च्या अफवांचे पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:40 PM2020-05-18T19:40:18+5:302020-05-18T19:40:44+5:30
सोमवारी झालेल्या कोरोनाबाधीताच्या मृत्यूमुळे पुढील १५ दिवस जिल्हा बंद राहणार, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरविल्या.
बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच एका मृत्यूमुळे पुढील १५ दिवस जिल्हा बंद राहणार, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरत आहेत. परंतु याची खात्री केली असता याबाबत जिल्हाधिकारी यांचा कसलाच आदेश नसल्याचे सांगण्यात आले. या अफवांमुळे मात्र नागरिक दिवसभर भितीने हैराण झाले होते.
जिल्ह्यात रविवारी ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यातील एका वृद्धेचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला तर सहा रुग्णांना विनंती वरून पुण्याला पाठविले आहे. त्यामुळे सध्या दोनच रुग्ण उपचार घेत आहेत. परंतू सोमवारी झालेल्या मृत्यूमुळे पुढील १५ दिवस जिल्हा बंद राहणार, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरविल्या. हाच संदेश दिवसभर सर्वत्र फिरला. नागरिकांनी याची खात्री न करता त्यावर विश्वास ठेवला आणि फोनाफोनी सुरू केली. परंतु असा कसलाही आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी सायंकाळभ ७ वाजेपर्यंत काढला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी अफवा पसरवू नये आणि त्यावर विश्वासही ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
बीड बंद बाबत जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत (सायं ७ वाजेपर्यंत) कसलाही आदेश काढलेला नाही. या केवळ अफवा आहेत.
- अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड