Beed: हॉटेलमध्ये चहा प्यायला बसले; कुख्यात गुन्हेगारांनी केला चाकूने वार, तिघांविरोधात गुन्हा
By सोमनाथ खताळ | Published: March 29, 2024 07:36 PM2024-03-29T19:36:42+5:302024-03-29T19:37:04+5:30
Beed News: चहा पिणाऱ्या मित्रांसोबत भांडण केले. नंतर त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेत त्यांच्यावर चाकूने वार केला. ही घटना २६ मार्च रोजी दुपारी आष्टी तालुक्यातील पांढरी टोलनाक्याजवळ घडली.
- सोमनाथ खताळ
बीड - चहा पिणाऱ्या मित्रांसोबत भांडण केले. नंतर त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेत त्यांच्यावर चाकूने वार केला. ही घटना २६ मार्च रोजी दुपारी आष्टी तालुक्यातील पांढरी टोलनाक्याजवळ घडली. याप्रकरणी २८ मार्च रोजी आष्टी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, हल्ला करणारे कुख्यात आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे.
भरत उर्फ भरव पांजऱ्या काळे, कैदी पांजऱ्या काळे (दोघेही रा.आंधळेवाडी ता.आष्टी) व सचिन भामट्या उर्फ भामऱ्या काळे (रा.नागझरी ता.गेवराई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोपट चंद्रकांत पांढरे (वय ३२ रा.पांढरी ता.आष्टी) हे २६ मार्च रोजी आपले मित्र अशोक पन्हाळकर व लक्ष्मन नेमाने यांच्यासोबत टोलनाक्याजवळील हॉटेलवर चहा पित होते. याचठिकाणी या आरोपींनी त्यांच्यासोबत भांडण केले. त्यानंतर भरत काळे याने पांढरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून पळून जात होता. परंतू त्यांनी पकडले. चैन परत मागताच भरत याने पांढरे यांच्या खांद्यावर चाकुने वार केला. त्यानंतर पन्हाळकर व नेमाणे वाचविण्यासाठी धावल्यावर कैदी काळे यानेही त्यांच्यावर हल्ला केला. इतर लोकांनी त्यांना आरोपींच्या तावडीतून सोडवले. परंतू तरीही त्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत तेथून धुम ठोकली. त्यानंतर या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर पांढरे यांनी आष्टी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून २८ मार्च रोजी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक धनवडे हे करत आहेत.