बीड, शिरूर कासारचे दोन ग्रामसेवक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:48 PM2020-01-18T23:48:25+5:302020-01-18T23:54:32+5:30
कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहून जिल्हा परिषद प्रशासनाला कोणताही खुलासा सादर न करणाऱ्या दोन ग्रामसेवकांना बडतर्फ करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शनिवारी ही कारवाई केली.
बीड : कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहून जिल्हा परिषद प्रशासनाला कोणताही खुलासा सादर न करणाऱ्या दोन ग्रामसेवकांना बडतर्फ करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शनिवारी ही कारवाई केली.
बीडपंचायत समितीमध्ये शैलजा सदाशिव भराटे नामक ग्रामसेवक कार्यरत होत्या. १ आॅक्टोबर २०१८ पासून त्या अनधिकृत गैरहजर राहिल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक भराटे यांच्या मूळ सेवा पुस्तिकेच्या पत्त्यावर कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला होता. परंतू सदर नोटीस परत आली होती. दुस-यांदा पाठविलेली नोटीसही घेण्यात आली नाही. त्यामुळे अंतिम संधी म्हणून जाहीर नोटिसीद्वारे दिलेल्या मुदतीत हजर न झाल्यास बडतर्फ करण्याबाबत कळविले होते. तरीही त्या रुजू जाल्या नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशांचे पालन केले नाही. तसेच कर्तव्याचे पालन न करता गैरवर्तन केले असल्याने ग्रामसेवक शैलजा भराटे यांना जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
दुसरे ग्रामसेवक एन. बी. पवार हे शिरुर कासार पंचायतसमितीमध्ये कार्यरत होते. ते देखील १० मार्च २०१७ पासून गैरहजर असल्याबाबत गटविकास अधिकाºयांनी पवार यांच्या मुळ पुस्तिकेच्या पत्त्यावर नोटीस पाठविली होती. त्याची पोहच अद्यापपर्यंत प्राप्त झाली नाही. त्यानंतर रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली. ती पोहच झाली, परंतु ग्रामसेवक पवार हजर झाले नाही. त्यामुळे अंतिम नोटिसीद्वारे सार्वजनिकरीत्या जाहीर करण्यात आले. तरीही हजर न झाल्याने त्यांनाही जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ग्रामसेवक शैलजा भराटे १५ महिन्यांपासून तर ग्रामसेवक पवार २ वर्षे १० महिन्यांपासून गैरहजर राहिल्याने, पाठविलेल्या नोटिसीला उत्तर दिले नाही.
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केले नाही. गटविकास अधिका-यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना अहवाल पाठविला होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना अहवाल पाठविला होता. त्यानुसार कर्तव्याचे पालन न करता गैरवर्तन केले. त्यामुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील)१९६४ मधील तरतुदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ही कारवाई केली.
ग्रामपंचायतींच्या तपासण्या सुरु
विस्तार अधिका-यांना ग्रामपंचायत तपासणीचे निर्देश दिले आहेत. महिन्यात १० ग्रामपंचायतींची सखोल तपासणी करण्याचे निर्देश आहेत. तसेच महिन्याच्या पहिल्या बैठकीत अहवाल सादर करावा लागणार आहे. त्याशिवाय त्यांचा दौरा व दैनंदिनी मंजूर केली जाणार नाही.