बीड शिवसेनेत खांदेपालट ; मुळूक, खांडे नवे जिल्हाप्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:51 AM2017-12-15T00:51:16+5:302017-12-15T00:55:28+5:30
अंतर्गत धुसफूस आणि वाद यामुळे बुधवारी रात्री शिवसेनेत मोठे फेरबदल झाले. अनिल जगताप आणि बाळासाहेब पिंगळे यांना डच्चू देत सचिन मुळूक व कुंडलिक खांडे यांच्या खांद्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी आ. प्रा. सुनील धांडे, माजी जिल्हाप्रमुख अॅड.चंद्रकांत नवले यांच्याकडे सहसंपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अंतर्गत धुसफूस आणि वाद यामुळे बुधवारी रात्री शिवसेनेत मोठे फेरबदल झाले. अनिल जगताप आणि बाळासाहेब पिंगळे यांना डच्चू देत सचिन मुळूक व कुंडलिक खांडे यांच्या खांद्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी आ. प्रा. सुनील धांडे, माजी जिल्हाप्रमुख अॅड.चंद्रकांत नवले यांच्याकडे सहसंपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्याची धुरा तरूणांच्या खांद्यावर दिली आहे. नियुक्ती पत्र बुधवारी रात्री ‘मातोश्री’वर देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मागील काही महिन्यांपासून बीड जिल्हा शिवसेनेत अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात सुरू होते. हे वाद अनेकवेळा बैठका, आंदोलने आणि सभांच्या माध्यमातनू समोरही आले होते. त्यातच जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत गेली. शिवसेनेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गट तयार झाले. या दोघांच्या वादाचा फायदा इतर पक्षांनी घेतला.
दिवसेंदिवस हा प्रकार वाढत गेला आणि बुधवारी रात्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी खांदेपालट केली. १३ वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिलेले अनिल जगताप व बाळासाहेब पिंगळे यांना कसलीही पूर्वसुचना न देता त्यांची पदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या जागी सचिन मुळूक व कुंडलीक खांडे या तरूणांना संधी देण्यात आली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेला विश्वास आणि जिल्ह्यात सुरू असलेली अंतर्गत वाद व गटबाजी संपवून जिल्ह्यात शिवसेनेचा दबदबा निर्माण करण्यात या दोन तरूणांना किती यश येते? हे येणारी वेळच ठरवेल.
शिवसेना कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी
जिल्हा प्रमुखांच्या बदलल्यांची माहिती समजताच जगताप, पिंगळे समर्थकांनी जालना रोडवरील जिल्हा कार्यालयात मोठी गर्दी केली. सायंकाळी ६ च्या सुमारास माजी मंत्री बदामराव पंडित, अनिल जगतापसह तालुकाप्रमुख व विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. काही कार्यकर्त्यांनी जगताप यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
बदामराव पंडित म्हणाले, निर्णय ऐकून मनाला वाईट वाटले. जगताप हे सोशल वर्कर आहेत. लोकांचे मन जिंकून ते काम करतात.
अनिल जगताप म्हणाले, सकाळी अचानक मला हा निर्णय समजला. कार्यकर्त्यांच्या जसा जिव्हारी लागला तसाच हा निर्णय माझ्याही जिव्हारी लागला. निर्णय ऐकून दु:ख वाटले परंतु शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय कदाचित जिल्ह्याच्या विकासासाठीही असू शकतो, त्यामुळे आताच आपण काही बोलणे चूक आहे.
२० डिसेंबरनंतर आपण कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. एवढेच नव्हे तर पुढे काय आणि कसे करायचे? ही त्यांना विचारून घेणार असल्याचा खुलासा जगताप यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला. मला हा निर्णय मान्य असल्याचेही त्यांनी कबूल केले.
अशी असेल जबाबदारी
कुंडलिक खांडे यांच्याकडे बीड, गेवराई व आष्टी विधानसभा मतदारसंघ सोपविला आहे तर सचिन मुळूक यांच्यावर माजलगाव, परळी व केज विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राहणार आहे. माजी आ. प्रा. सुनील धांडे हे बीड, गेवराई व आष्टी विधानसभेसाठी सहसंपर्कप्रमुख म्हणून काम करतील. अॅड.चंद्रकांत नवले हे माजलगाव, परळी व केज विधानसभा मतदारसंघासाठी सहसंपर्कप्रमुख म्हणून निवडले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य विलास महाराज शिंदे यांना बीड लोकसभा संघटक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.