बीड एस.टी. महामंडळाला आंदोलनाचा फटका; ४०० बसफेऱ्या केल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 07:35 PM2018-07-27T19:35:20+5:302018-07-27T19:36:50+5:30

बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात  मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बीड विभागातून तब्बल ४०० बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. 

Beed ST The agitation of the corporation; 400 turns have been canceled | बीड एस.टी. महामंडळाला आंदोलनाचा फटका; ४०० बसफेऱ्या केल्या रद्द

बीड एस.टी. महामंडळाला आंदोलनाचा फटका; ४०० बसफेऱ्या केल्या रद्द

Next
ठळक मुद्दे अनेक ठिकाणी सर्वसामान्यांची लालपरी तसेच शिवशाही बस अज्ञात आंदोलकांच्या निशाण्यावर होत्या. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास २५ बसेसवर दगडफेक झाली

बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात  मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बीड विभागातून तब्बल ४०० बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. 

२१ जुलैपासून आंदोलन तीव्र होत गेले.  अनेक ठिकाणी सर्वसामान्यांची लालपरी तसेच शिवशाही बस अज्ञात आंदोलकांच्या निशाण्यावर होत्या. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास २५ बसेसवर दगडफेक झाल्याने राज्य परिवहन महामंडळाचे नुकसान झाले तर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. मंगळवारी बंद पुकारण्यात आल्याने सोमवारी रात्रीपासूनच बीड येथून होणारी बससेवा बंद असल्यातच जमा होती. 

त्यामुळे पंढरपुरहून बीडमार्गे खान्देश, विदर्भातील गावांना जाणाऱ्या वारकरी प्रवाशांना बीड येथील बसस्थानकावर ताटकळावे लागले. दोन दिवस रात्री बससेवा बंदमुळे शेकडो प्रवाशांना  बसस्थानकावरच रात्र काढावी लागली. तर काहींनी खाजगी प्रवास पसंत केला. बीड जिल्ह्यात  परिस्थिती सामान्य असली तरी बुधवारी गेवराईत, गुरुवारी जालना तसेच इतर जिल्ह्यात उमटणारे पडसाद लक्षात घेत बस आणि प्रवासी यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून एस. टी. प्रशासनाने बसेस बंद ठेवल्या. प्रवाशांच्या आग्रहाखातर  बंदोबस्त मिळेल तशा व पोलिसांच्या अनुमतीनंतर काही बसेस सोडण्यात आल्या. 

दोन दिवसांपासून बीड येथून जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील लांब पल्ल्याच्या बससेवा बंद ठेवाव्या लागल्या. त्यामुळे जालना, औरंगाबाद, सोलापूर, नगर, पुणे भागात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.बीड आगाराच्या २९८ पैकी १२० बसेस बाहेरगावी गेल्या नाहीत. सुरक्षित व शांत असलेल्या ग्रामीण भागातच बस फेऱ्या झाल्या. तर बीड विभागातील अपेक्षित ९५९ फेऱ्यांपैकी केवळ ५४४ फेऱ्याच झाल्या. जवळपास ४०० फेऱ्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे.

Web Title: Beed ST The agitation of the corporation; 400 turns have been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.