बीडचे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहणार रॉकेट लॉन्चिंग; ३३ विद्यार्थी 'इस्रो'कडे रवाना
By शिरीष शिंदे | Published: April 17, 2023 07:26 PM2023-04-17T19:26:53+5:302023-04-17T19:27:14+5:30
या सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केंद्र, तालुका व जिल्हा परीक्षेद्वारे करण्यात आलेली आहे.
बीड: जिल्ह्यातील ३३ विद्यार्थी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी रवाना सोमवारी सकाळी ९ वाजता बीड शहरातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून रवाना झाले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सदरील सहलीस हिरवा झेंडा दाखविला.
जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यां साठी इस्रो शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हास्तरावरुन सर्व नियोजन सुरू होते. या सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केंद्र, तालुका व जिल्हा परीक्षेद्वारे करण्यात आलेली आहे. एकूण २२२७६ विद्यार्थ्यांमधून केंद्रस्तर, तालुकास्तर, आणि जिल्हास्तर अशा ३ परीक्षा घेऊन त्या यश मिळवलेल्या गुणवत्ता धारक ३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थी बेंगलोर येथील विश्वेश्वरय्या म्युझियम, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इस्त्रो, थुंबा तिरुअनंतपुरम येथील रॉकेट लॉन्चिंग, तिरुअनंतपुरम येथील प्राणी संग्रहालय आणि कन्याकुमारी अशा ठिकाणी जाणार आहेत. या सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एस.पी. ठाकूर, सीईओ अजित पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात दोन विद्यार्थी युवराज सानप व भाविका फड यांचे स्वागत केले. यावेळी पालक, शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकारी गेले विद्यार्थ्यांसोबत
सदरील सहलीसोबत मार्गदर्शक व काळजीवाहक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, , उपशिक्षणाधिकारी (प्रा.) अजयकुमार बहिर, आष्टी येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, अंबाजोगाई येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वासंती चव्हाण, इस्त्रो, नासा शैक्षणिक अभ्यास दौरा जिल्हा समन्वयक राहूल चाटे, कैलास पवार व श्रीमती उषा लव्हारे हे सोबत रवाना झाले आहेत. सर्व विद्यार्थी प्रत्यक्ष रॉकेट लॉन्चिंग बघणे व पहिल्यांदा विमानाने जाण्यासाठी आतुर झाले आहेत. या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेची आवड व शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.