Beed: अपघाताचा बनाव करून टँकर चालकाने २५ लाखांचे सोयाबीन तेल परस्पर विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:35 IST2025-04-17T12:33:35+5:302025-04-17T12:35:50+5:30

टँकर चालक-मालक व एका मध्यस्थ व्यक्तीस परळी ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले

Beed: Tanker driver faked an accident and sold soybean oil worth Rs 25 lakhs to others | Beed: अपघाताचा बनाव करून टँकर चालकाने २५ लाखांचे सोयाबीन तेल परस्पर विकले

Beed: अपघाताचा बनाव करून टँकर चालकाने २५ लाखांचे सोयाबीन तेल परस्पर विकले

परळी : टँकरला अपघाताचा बनाव करून 25 लाख रुपये किमतीचे २० टन सोयाबीन रिफाइंड तेल परस्पर विकल्याचा आरोपावरून टँकर चालक-मालक व एका मध्यस्थ व्यक्तीस परळी ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन आरोपींना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश परळी न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, परळी तालुक्यातील धर्मापुरी रस्त्यावर सहा महिन्यापूर्वी टँकरचा अपघात झाल्याचा बनाव करून सोयाबीन रिफाईन तेल विकल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून तेलाची खरेदी विक्री करणारे व्यापारी संजय ज्ञानोबाराव फुके यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 11 एप्रिल २०२५ रोजी फिर्याद दाखल केली आणि टँकर चालक-मालक राजेंद्र शिवाजी मुंडे ( राहणार सेलमोहा तालुका गंगाखेड  जिल्हा परभणी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा परळी ग्रामीण पोलिसांनी द्रुतगतीने तपास केला. 14 एप्रिल रोजी राजेंद्र मुंडे यास लातूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच मध्यस्थ समीर शफीक काझी (राहणार लातूर) यास ही 16 एप्रिल रोजी ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपींना परळीच्या न्यायालयात  परळी ग्रामीण पोलिसांनी हजर केले असता दोघा जणांना 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

ही कारवाई परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, अंकुश निमोणे पोलीस हवालदार नवनाथ हरगावकर, सुनील अन्नम्मवार यांनी केली आहे. ज्या टँकरमधून तेलाची विक्री केली तो टँकरही लवकरच जप्त करण्यात येणार असल्याची माहिती परळी ग्रामीण  पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Beed: Tanker driver faked an accident and sold soybean oil worth Rs 25 lakhs to others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.